यंदा यूईएफए चॅम्पियन्स लीग (UEFA Champions League) फायनल्समध्ये भारतातून विशेष पाहुणा म्हणून बॉलीवूड सुपरस्टार फरहान अख्तर खास उपस्थित असणार आहे. ‘यूईएफए’चा भारतातील अधिकृत अतिथी म्हणून तो अंतिम सामने पाहणार असून स्पेन येथील मेट्रोपॉलिटॅनो स्टेडियम येथे १ जून २०१९ रोजी होणाऱ्या या सामन्याला तो हजेरी लावणार आहे.

गुणवंत अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून नावलौकिक मिळावलेला फरहान अख्तर हा स्वतः फुटबॉलप्रेमी आहे. क्रिडा क्षेत्राबाबतच्या त्याच्या आवडीबद्दल तो बऱ्याचदा बोलला आहे. विशेषतः फुटबॉलबद्दल तो भरभरून बोलतो. तो आजही आपल्या मित्रांसोबत फुटबॉल खेळायला जातो. या स्पर्धेच्या उपांत्य व महाअंतिम फेऱ्यांदरम्यान सोनी पिक्चर्स स्पोर्ट्स नेटवर्क या यूईएफएच्या अधिकृत प्रसारण वाहिन्यांवर फरहान अख्तर या खेळाप्रतिचे त्याचे प्रेम व्यक्त करणार आहे.

यूईएफए ही जगातील सर्वांत चुरशीची क्रिडा स्पर्धा मानली जाते. यूईएफए चॅपियन्स लीग ही जगातील काही मानाच्या क्लब स्पर्धांपैकी एक आहे. यात रिअल मॅड्रीड, एफसी बार्सेलोना,मॅन्चेस्टर युनायटेड, बॅरेन म्युनिच, पॅरिस सेंट – जर्मेन, ज्युवेण्टस आदी युरोपियन क्लब्स सहभागी होतात. गेली साठ वर्षे खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेतील यूसीएलमध्ये सहभागी होण्यासाठी व युरोपियन फूटबॉल क्षेत्रात आपले नाव कमावण्यासाठी अनेक खेळाडू आणि व्यवस्थापक आतूर असतात.

फरहान ‘माय रिझन्स टू वॉच यूईएफए चॅम्पियन्स लीग’ (My reasons to watch UEFA Champions League)  या मोहिमेअंतर्गत आपल्याशी संवाद साधणार आहे. यूईएफए चॅम्पियन्स लीग पाहण्यामागची आपली नेमकी भूमिका आणि कारण काय हे ‘फॅनबॉईज’पासून ‘पेरिफेरल फूटबॉल व्ह्यूअर्स’पर्यंत सगळेजण खुलेपणाने सांगू शकतील, हे या मोहिमेचे ध्येय आहे.