विक्टर सायगानकोव्ह याने मिळालेल्या संधीचे सोने करत युक्रेनला नेशन्स लीग फुटबॉलमध्ये स्पेनवर १-० असा विजय मिळवून दिला. युक्रेनचा हा स्पेनवरील १७ वर्षांतील पहिला विजय ठरला.

कियिव्ह ऑलिम्पिक स्टेडियमवर जवळपास १५ हजार चाहत्यांच्या उपस्थितीत रंगलेल्या या सामन्यात प्रेक्षकांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे खेळाडूही आनंदित झाले.

जर्मनीची स्वित्झर्लंडशी बरोबरी

स्वित्झर्लंडच्या अप्रतिम खेळामुळे जर्मनीला बरोबरीसाठी संघर्ष करावा लागला. जर्मनीने पिछाडीवरून मुसंडी मारत ३-३ अशी बरोबरी साधली. ५६व्या मिनिटाला स्वित्झर्लंड ३-२ अशा आघाडीवर होता. पण चार मिनिटांनी सर्जे नॅब्रीचा गोल जर्मनीला बरोबरी साधून देणारा ठरला.

ब्राझील, अर्जेटिनाची आघाडी

नेयमारच्या हॅट्ट्रिकमुळे ब्राझीलने दक्षिण अमेरिकेतील विश्वचषक पात्रता फेरीत पेरूचा ४-२ असा पराभव केला. पेरूने ५९व्या मिनिटाला २-१ अशी आघाडी घेतली होती. पण ६४व्या मिनिटाला रिचर्डसनने केलेल्या गोलमुळे ब्राझीलने बरोबरी साधली. त्यानंतर २४व्या, ८३व्या आणि भरपाई वेळेत गोल करत नेयमारने हॅट्ट्रिक साजरी केली. लिओनेल मेसीच्या अर्जेटिनाने बोलिव्हियाला २-१ असे नमवले.