ऋषिकेश बामणे

भारताच्या पहिल्यावहिल्या अल्टिमेट खो-खो लीगचा थरार अनुभवण्यासाठी चाहत्यांना सप्टेंबर महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. परंतु स्पर्धेच्या थेट प्रक्षेपणाचा करार सोनी क्रीडा वाहिनीशी पक्का झाल्याने खो-खोप्रेमींना दूरचित्रवाणी तसेच भ्रमणध्वनीवर सामन्यांचा आनंद लुटता येणार आहे.

भारतीय खो-खो महासंघाच्या (केकेएफआय) सोमवारी झालेल्या बैठकीदरम्यान लीगच्या पुढील वाटचालीविषयी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. एप्रिल २०१९मध्ये अल्टिमेट लीगची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी ऑक्टोबरमध्ये पहिले पर्व रंगेल, असे सांगण्यात आले होते. परंतु राष्ट्रीय आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आयोजनामुळे ही लीग आधी डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर प्रक्षेपण कराराच्या समस्येमुळे लीगसाठी फेब्रुवारी महिन्याचा मुहूर्त ठरवण्यात आला. गतवर्षी करोना साथीमुळे मार्च महिन्यापासून जवळपास सर्वच खो-खो स्पर्धा रद्द कराव्या लागल्याने, अखेर आता पुन्हा या स्पर्धेच्या आयोजनाकरिता महासंघाने पावले उचलली आहेत.

देश-विदेशातील पुरुष खो-खोपटू आणि १८ वर्षांखालील मुलांच्या समावेशासह खेळवल्या जाणाऱ्या अल्टिमेट लीगच्या लढतींचे हिंदी, इंग्रजी भाषेतील समालोचनासह थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. अन्य भाषांमध्येही ही सुविधा पुरवण्यासाठी महासंघ प्रयत्नशील आहे. त्याशिवाय ‘सोनी लिव्ह’ या अ‍ॅपद्वारेही प्रेक्षक सामने पाहू शकणार आहेत. स्पर्धेच्या अंतिम तारखांविषयी मात्र अद्याप काहीही निर्णय घेण्यात आलेला नाही.

‘‘अल्टिमेट खो-खो लीगमधील सामन्यांच्या थेट प्रक्षेपणाचा करार सोनी क्रीडा वाहिनीशी झाल्याने आम्ही आनंदी आहोत. परंतु अन्य कोणत्याही खेळाच्या स्पर्धेशी खो-खो लीगच्या तारखांचा घोळ होणार नाही, याकडे आम्ही लक्ष देऊन आहोत. त्यामुळे सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये उपलब्ध असलेल्या २१ दिवसांच्या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. त्यादृष्टीने लवकरच आम्ही लीगच्या अंतिम तारखा जाहीर करू,’’ असे भारतीय खो-खो महासंघाचे सरचिटणीस महेंद्रसिंग त्यागी म्हणाले.

‘‘नवी दिल्लीत फेब्रुवारीमध्ये निवडक खेळाडूंसह मॅटवर खेळवण्यात आलेल्या खो-खो सुपर लीगद्वारे अल्टिमेट लीगच्या आयोजनाची चाचपणी करण्यात आली. त्यामुळे आयोजकांसह खेळाडूंनासुद्धा लीगच्या प्राथमिक स्वरूपाविषयी पुरेशी कल्पना मिळाली आहे,’’ असेही त्यागी यांनी सांगितले.

राष्ट्रीय स्पर्धा होणारच!

उस्मानाबाद येथे २४ ते २८ मार्चदरम्यान होणारी पुरुष आणि महिलांची राष्ट्रीय खो-खो स्पर्धा राज्यातील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आली. परंतु भारतीय खो-खो महासंघाचे सरचिटणीस महेंद्रसिंग त्यागी यांनी अल्टिमेट लीगपूर्वी राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन १०० टक्के करण्यात येईल, याची खात्री दिली. ‘‘महाराष्ट्रातील करोनाची परिस्थिती येत्या काही महिन्यांत सुधारल्यास आम्ही राष्ट्रीय स्पर्धा तेथेच खेळवू. परंतु तसे न झाल्यास नाइलाजास्तव अन्य राज्यात ही स्पर्धा खेळवावी लागेल. अल्टिमेट लीगपूर्वी खेळाडूंची लिलावप्रक्रिया होणार असून त्यासाठी राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरीचा आढावा घेणे संघमालकांसाठी सोयीचे ठरेल, त्यामुळे राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन महत्त्वाचे आहे,’’ असे त्यागी यांनी सांगितले.