पहिल्या हंगामाला ८ फेब्रुवारीपासून प्रारंभ; पुणे, दिल्ली येथे सामन्यांचे आयोजन

ऋषिकेश बामणे, मुंबई</strong>

भारताच्या पहिल्यावहिल्या अल्टिमेट खो-खो लीगचा मुहूर्त अखेर ठरला आहे. पुढील वर्षी ८ ते २९ फेब्रुवारीदरम्यान पुणे आणि दिल्ली येथे या स्पर्धेचा पहिला हंगाम रंगणार आहे. त्याशिवाय नागपूर आणि बेंगळूरु यांपैकीही एका शहरात या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेमुळे खो-खो लीगचे आयोजन नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यातून पुढे ढकलण्यात आले होते. परंतु आता मात्र भारतीय खो-खो महासंघाने पहिल्या पर्वाच्या तारखांची अधिकृत घोषणा केली आहे. त्याशिवाय पुढील महिन्यात खेळाडूंची लिलाव प्रक्रियासुद्धा होणार आहे.

‘‘सहा संघांमध्ये रंगणाऱ्या या स्पर्धेतील संघांची नावे अद्याप ठरलेली नाहीत. परंतु फ्रेंचायझीसह पुढील महिन्यात होणाऱ्या बैठकीदरम्यान संघांची नावे व खेळाडूंची लिलाव रक्कम ठरवली जाईल,’’ असे भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव चंद्रजीत जाधव यांनी सांगितले.

लीगसाठी खास मॅट्स!

‘‘खो-खो लीगसाठी खास कमी जाडीच्या मॅट्स तयार करण्यात आल्या असून खेळाडूंच्या बुटांविषयी अंतिम निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. मे महिन्यात दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियममध्ये देशातील ४० खेळाडूंची खो-खो लीगच्या नियमानुसार मॅटवर रंगीत तालीम घेण्यात आली होती. या स्पर्धेसाठी ३०-४० मिमीच्या मॅट्स वापरण्यात येणार असून सूर अथवा खुंट मारताना खेळाडूंना इजा होऊ नये म्हणून मॅटच्या वरील बाजूचा भाग काहीसा जाडसर बनवण्यात आला आहे,’’ असे भारतीय खो-खो महासंघाचे सरचिटणीस महेंद्रसिंग त्यागी यांनी सांगितले.

खो-खो लीगचे नियम पुढीलप्रमाणे

’ ७ मिनिटांचे प्रत्येकी ४ डाव. एकूण २८ मिनिटांचा एक सामना.

’ प्रत्येक डावानंतर तीन मिनिटांची व मध्यंतराला सहा मिनिटांची विश्रांती.

’ प्रत्येक संघात वेगळ्या रंगाची जर्सी घातलेले दोन वजीर असतील. त्यांना कोणत्याही दिशेने धावण्याची मुभा.

’ एका संघाला १५ खेळाडू निवडण्याची परवानगी. त्यातील ५ खेळाडू विदेशी असणे अनिवार्य.

’ पहिल्या डावात सुरुवातीला बाद झालेल्या खेळाडूंऐवजी उर्वरित खेळाडूंना दुसऱ्या डावात संरक्षण करण्याची संधी.

’ खुंट मारून किंवा सूर मारून प्रतिस्पर्धी खेळाडूला बाद केल्यास बोनस गुण.