वेगवान गोलंदाज उमेश यादवला विश्वास; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

पूर्वीच्या तुलनेत सध्या विदर्भातून मोठय़ा प्रमाणात दर्जेदार क्रिकेटपटू पुढे येत आहेत. आदित्य ठाकरे, अथर्व तायडे यांची १९ वर्षांखालील भारतीय संघात निवड होणे हे शुभ संकेत आहेत. माझ्यानंतरही विदर्भातून अनेक उमेश यादव भारताला मिळतील याची मला खात्री आहे, असा विश्वास भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने लोकसत्ताला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान व्यक्त केला.

विदर्भातील खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी जिद्द आणि मेहनतीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. हाच एकमेव पर्याय आहे. त्यासाठी खेळाडूंना अनेक गोष्टींचा त्यागही करावा लागतो. आपल्या मजबूत आणि कमजोर बाजूंची जाण खेळाडूंना असावी. वेळोवेळी त्यात सुधारणा करावी. शिवाय शिस्त ही आवश्यक आहे. तुम्ही ठरवल्याप्रमाणे शंभर टक्के योगदान दिले तर अनेक नवोदित खेळाडूंना संघात जागा मिळू शकते. विदर्भातील खेळाडूंमध्ये ती क्षमता आहे. शिवाय विदर्भात वेगवान गोलंदाजांची गुणवत्ताही भरपूर आहे, असे उमेश म्हणाला.

दुखापतीबद्दल उमेश म्हणाला की, मला पहिल्यांदा भरपूर दुखापती व्हायच्या. कारण मी तेव्हा टेनिस आणि लेदर दोन्ही खेळत होतो. टेनिसमध्ये ४ तर लेदरमध्ये १० आणि आता कसोटीमध्ये २० षटके टाकावी लागतात. त्यामुळे दुखापत होते. तसेही वेगवान गोलंदाजांना दुखापत होतच असते आणि त्याला ते घेऊन खेळावेच लागते. २००९ मध्ये तर दुखापतीमुळे मला दक्षिण आफ्रिका येथून परत यावे लागले होते.

खाण्यापिण्याविषयी उमेश विशेष आग्रही नाही. एका विशिष्ट हॉटेलमध्ये जाणे, तेथे खाणे असा माझा आग्रह नसतो, उलट चहाच्या दुकानावर मित्रांसोबत गप्पा करणे आवडते, असे त्याने सांगितले.

माझा आवडता क्रिकेटपटू कपिल देव आहे. त्याला बघूनच मी मोठा झालो. त्यावेळी वेगवान गोलंदाज म्हणजे जहीर खान, जावेगल श्रीनाथ, अजित आगारकर, आशीष नेहरा असे नामांकित खेळाडू होते. त्यांच्याकडून भरपूर काही शिकायला मिळाले. त्यांच्यानंतर आता मी, मोहम्मद शामी, इशांत शर्मा आम्ही १४० च्या वेगाने गोलंदाजी करतो.

सध्या आपल्याकडे कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेंन्टी-२० सामन्यांसाठी विविध गोलंदाजांचा उपयोग होतो. त्यामुळे एकाच गोलंदजावर ताण येत नाही. त्याचा फायदा खेळाडूंसोबतच संघालाही होतो, असे उमेश म्हणाला.

प्रशांतने दिला लेदर बॉल खेळण्याचा सल्ला

मला विदर्भ क्रिकेट संघटनेने जिल्हा एकादश खेळण्याची संधी दिली, हे जरी खरे असले तरी मला टेनिस बॉल क्रिकेटमधून लेदर बॉल क्रिकेट खेळण्याच सल्ला माझा मित्र प्रशांत तागडेने दिला. प्रशांत आणि मी दोघेही टेनिस खेळत होतो. तो विदर्भ जिमखानाकडून खेळायचा. त्याने एकदिवस मला तू विदर्भ जिमखानाकडून लेदर बॉल खेळशील का? आम्ही नवी टीम तयार केली आहे. मात्र, आमच्याकडे गोलंदाज नाही, असे तो म्हणाला. तेव्हा मी लगेच होकार दिला. एस.बी. सिटी कॉलेजच्या मदानावर झालेल्या त्या सामन्यात मी स्पाईकच्या जोडय़ाशिवाय १० षटकांत ३ गडी बाद केले. त्यानंतर लोकांना कळले की कोणी उमेश यादव नावाचा खेळाडू वेगवान गोलंदाजी करतो अन् तेथून माझा लेदर बॉल क्रिकेटचा खरा प्रवास सुरू झाला. त्यानंतर मी अनेक सामने खळलो. कोशिश फाऊंडेशनच्यावतीने आयोजित प्रिमियर लीग (केपीएल) नंतर व्हीसीएच्या पर्यवेक्षकांना माझ्या गोलंदाजीविषयी कळवण्यात आले. त्यानंतर मला विदर्भ क्रिकेट संघटनेकडून माजी सचिव राजू गोखले सरांचा फोन आला. त्यांनी तू व्हीसीएकडून जिल्हा एकादश खेळशील का, असे विचारले. मी मदानावर गेलो तेव्हा माझ्याजवळ स्पाईकचे जोडे नसल्याने तेथून मला पळवून लावले. त्यानंतर मी भरपूर क्रिकेट खेळलो व रणजी सामन्यासाठी माझी निवड झाली. मध्यप्रदेश विरुद्ध माझा पहिला रणजी सामना होता अन् माझे प्रशिक्षक प्रीतम गंधे सरांनी माझ्यावर  टाकलेला विश्वास मी सार्थ ठरवला. या सामन्यात मी सर्वाधिक ५ गडी टिपले

मित्रांसाठी मी आजही बबलू

मी भारतीय क्रिकेट संघाचा सदस्य असलो तरी आज मी माझ्या जुन्या मित्रांना विसरलो नाही. ते मला आजही ‘बबलू’ याच नावाने बोलावतात. मनीष गायधने, सुमित चांदेकर, शैलेश ठाकरे आजही माझे जीवलग मित्र आहेत. जेव्हाही मी मालिका खेळून नागपुरात येतो तेव्हा ते मला तसेच भेटतात, जसे पूर्वी भेटायचे. त्यांच्याशी मी तशाच गप्पा मारतो, जसे पूर्वी मारायचो. उलट ते आता घाबरतात की आपण जर काही बोललो तर बबलू नाराज होईल. मात्र, माझा स्वभाव त्यांच्यासाठी पूर्वीसारखाच आहे.

क्रिकेटला परतावा देणार

आज मी जे काही आहे ते केवळ क्रिकेटमुळेच. मी जे काही शिकलो ते मी क्रिकेटला परत देईल. नागपुरात अकादमी किंवा क्लब सुरू करण्याबाबत अद्याप विचार केला नाही. मात्र, जेव्हा माझे आंतरराष्ट्रीय क्रिकेट संपुष्टात येईल, त्यानंतर येथील खेळाडूंसाठी नक्कीच मी काहीतरी करील. कारण माझ्यामुळे जर कोणाचे चांगले होत असेल तर मला आवडेल.