News Flash

उमेश यादवचे दमदार शतक

विदर्भच्या आव्हानाचा पाठलाग करताना ओदिशाची आश्वासक सुरुवात झाली नाही.

विदर्भ सर्वबाद ४६७; ओदिशा २ बाद ७९

वेगवान गोलंदाज उमेश यादवने आपल्या गोलंदाजीसारखेच जलद शतक लगावले आणि त्याच्या नाबाद शतकाच्या जोरावर विदर्भाने पहिल्या डावात ४६७ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल ओदिशाची दुसऱ्या दिवसअखेर २ बाद ७९ अशी अवस्था आहे.

पहिल्या दिवशीच्या ६ बाद २५६ धावांवरून पुढे खेळताना विदर्भचे दोन फलंदाज काही धावांमध्येच बाद झाल्यावर त्यांचा डाव तिनशे धावांच्या जवळपास तंबूत परतेल, असे वाटत होते. पण उमेशने धडाकेबाज शतकी खेळी साकारत ओदिशाचे सारे समीकरण बिघडवले. उमेशने नवव्या विकेटसाठी अक्षय वाखरेच्या साथीने १०२ धावांची भागीदारी रचली, यामध्ये आदित्यच्या ३४ धावा होत्या. उमेशने विदर्भची धावसंख्या फुगवण्यात मोलाचा वाटा उचलला. उमेशने अखेरच्या विकेटसाठी रवीकुमार ठाकूरच्या (८) साथीने ७२ धावांची भागीदारी रचली. उमेश यावेळी ऐन रंगात आला होता. ओदिशाच्या प्रत्येक गोलंदाजावर तो तुटून पडत होता. पण सूर्यकांत प्रधानने ठाकूरला पायचीत पकडत ही जोडी फोडली आणि विदर्भचा पहिला डाव आटोपला. उमेशने यावेळी नजाकतभऱ्या फटक्यांचा नमुना पेश करत ११९ चेंडूंमध्ये सात चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर नाबाद १२८ धावांची तडाखेबंद खेळी साकारली. ओदिशाकडून यावेळी बसंत मोहंती आणि प्रधान यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले.

विदर्भच्या आव्हानाचा पाठलाग करताना ओदिशाची आश्वासक सुरुवात झाली नाही. त्यांचे दोन्ही सलामीवीर ४५ धावांमध्ये तंबूत परतले. पण त्यानंतर गोविंदा पोड्डोर (खेळत आहे २१) आणि अनुराग सारंगी (खेळत आहे ९) यांनी उर्वरित वेळ खेळून काढल्यामुळे संघाची दिवसअखेर २ बाद ७९ अशी स्थिती आहे.

संक्षिप्त धावफलक

विदर्भ (पहिला डाव) : १४३.४ षटकांत सर्व बाद ४६७ (उमेश यादव नाबाद १२८, आदित्य शनावरे ११९; बसंत मोहंती २/७९) वि. ओदिशा (पहिला डाव) : ३४ षटकांत २ बाद ७९ (गिरिजा रौत २५; रविकुमार ठाकूर १/११).

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2015 2:01 am

Web Title: umesh yadav slams maiden first class century
Next Stories
1 इंडियन सुपर लीग स्पर्धा : गतविजेत्यांचा उत्साह बुलंद!
2 जगाच्या पाठीवर भारतीय पिछाडीवरच
3 सानिया-हिंगिस अंतिम फेरीत
Just Now!
X