News Flash

करोनामुळे IPL सोडण्याचा निर्णय घेतला, पण मायदेशी नाही जाऊ शकले पंच पॉल रॅफेल; आता…

"रॅफेल यांनी गुरूवारी तातडीने दोहामार्गे ऑस्ट्रेलियात परतण्याचा निर्णय घेतला होता. विमानाचे तिकीटसुद्धा खरेदी केले होते..."

(संग्रहित छायाचित्र : ICC)

मायदेशी जाणारे विमान रद्द झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे पंच पॉल रॅफेल यांना आता ‘आयपीएल’ संपेपर्यंत कार्यरत राहावं लागणार आहे. भारतामधील रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्यामुळे ऑस्ट्रेलिया सरकारने हवाई वाहतूक स्थगित केली आहे. या पार्श्वभूमीवर रॅफेल यांनी गुरूवारी तातडीने दोहामार्गे ऑस्ट्रेलियात परतण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी तिकीटसुद्धा खरेदी केले होते.

‘‘भारतामधील करोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन मी दोहामार्गे मायदेशी परतण्यासाठी प्रयत्न केला. त्या दृष्टीने तिकीटसुद्धा खरेदी केले. परंतु हवाई प्रवास निर्बंधांमुळे ते रद्द करण्यात आले,’’ असे रॅफेल यांनी सांगितले. त्यामुळे रॅफेल आता ‘आयपीएल’ संपल्यानंतर म्हणजे ३० मेनंतरच ऑस्ट्रेलियात परतू शकणार आहेत. तोपर्यंत ते आयपीएलमध्येच कार्यरत असतील.

तर, कुटुंबातील दोन सदस्यांना करोनाची लागण झाल्यामुळे भारताचे अव्वल पंच नितीन मेनन यांनी यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग ट्वेन्टी-२० क्रिकेटमधून माघार घेतली आहे. पत्नी आणि आईला करोनाची बाधा झाल्यामुळे इंदूरनिवासी मेनन यांनी ‘आयपीएल’च्या जैव-सुरक्षा परिघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) विशेष श्रेणीतील पंचांमध्ये भारताच्या फक्त मेनन यांचा समावेश आहे. भारतात नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले जात होते. ‘‘कुटुंबातील सदस्यांना करोनाची लागण झाल्यामुळे आपली मानसिक स्थिती सामन्यात पंचगिरी करण्यासाठी योग्य नसल्याचे मेनन यांनी स्पष्ट करीत स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला,’’ असे मेनन यांनी सांगितले.

मातृशोकामुळे सामनाधिकारी मनू नायर ‘आयपीएल’बाहेर

मातृशोकामुळे सामनाधिकारी मनू नायर यांनीही अहमदाबादच्या ‘आयपीएल’ जैव-सुरक्षा परीघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी झालेल्या दिल्ली आणि बेंगळूरु या सामन्याला त्यांनी पंचगिरी केली होती. ‘‘बुधवारी रात्री नायर यांच्या आईचे झोपेतच निधन झाले. हे वृत्त कळल्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले आहेत. ते स्पर्धेत परततील का, याविषयी खात्री नाही,’’ असे सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 12:23 pm

Web Title: umpire paul reiffel unable to fly out of india despite having decided to pull out of ipl 2021 sas 89
टॅग : IPL 2021
Next Stories
1 ‘बॅटिंग कशी करावी हे पृथ्वी शॉनं दाखवलं’, KKR च्या कामगिरीवर ब्रेंडन मॅकल्लम नाराज; संघात बदलाचे संकेत
2 बेंगळूरुचा विजयरथ रोखणे पंजाबसाठी आव्हानात्मक
3 VIDEO : ६ चौकार खाल्ल्यानंतर KKRच्या शिवम मावीने धरली पृथ्वीची मान!
Just Now!
X