‘आयओसी’चे माजी उपाध्यक्ष गॉस्पेर यांची सूचना

सिडनी : लांबणीवर पडलेल्या आणि आयोजनासाठी प्रचंड विरोध असलेल्या टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे भवितव्य आता संयुक्त राष्ट्रांनी ठरवावे, अशी सूचना आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे (आयओसी) माजी उपाध्यक्ष केव्हन गॉस्पेर यांनी केली आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेला २३ जुलैपासून सुरुवात होत असून टोक्योमध्ये करोनाग्रस्तांचा वाढता आकडा पाहता या स्पर्धेच्या आयोजनाला जपान तसेच जगभरातून कडाडून विरोध होत आहे. टोक्यो आणि जपानमधील अन्य शहरांमध्ये टाळेबंदीची घोषणा करण्यात आली आहे.

‘‘त्रयस्थ म्हणून विचार केल्यास, हा खेळाच्या किंवा एखाद्या राष्ट्रीय हिताच्या पलीकडचा विषय आहे. जगभरात करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत टोक्यो ऑलिम्पिकचे आयोजन करावे अथवा नाही, यासाठी संयुक्त राष्ट्रांनी पुढाकार घेण्याची गरज आहे,’’ असे ‘आयओसी’चे मानद सदस्य असलेल्या गॉस्पेर यांनी ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टर्स कॉर्पोरेशनच्या ‘द तिकीट’ या कार्यक्रमादरम्यान सांगितले.

ऑलिम्पिक स्पर्धा दुसऱ्यांदा पुढे ढकलता येणार नाही. २०२१मध्ये ही स्पर्धा होऊ शकली नाही तर ती रद्द करावी लागेल, असे ‘आयओसी’ आणि संयोजन समितीने स्पष्ट केले आहे. गॉस्पेर म्हणाले की, ‘‘याआधीही ‘आयओसी’ने संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली आहे. कारण या स्पर्धेत २०५ देशांचा सहभाग असणार आहे.’’