उदयोन्मुख बॅडमिंटनपटू के. श्रीकांतने थायलंडच्या बूनसक पोनसानाला नमवत थायलंड ग्रां. प्रि. जेतेपदावर कब्जा केला. २० वर्षीय श्रीकांतचे हे पहिलेच जेतेपद आहे. आंध्र प्रदेशमधील गुंटुरचा रहिवासी असलेल्या श्रीकांतने स्थानिक खेळाडू आणि जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या पोनसानावर २१-१६, २१-१२ असा सरळ गेम्समध्ये विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरले. सायना नेहवालप्रमाणे अन्य भारतीय बॅडमिंटनपटूंमध्येही आंतरराष्ट्रीय स्पर्धाची जेतेपदे पटकावण्याची क्षमता असल्याचे श्रीकांतच्या यशाने सिद्ध झाले आहे.
पहिल्या गेममध्ये दोघांमध्ये जोरदार मुकाबला रंगला. १५-१६ अशी गुणस्थिती असताना पोनसानाच्या हातून चुका झाल्या. त्याचवेळी श्रीकांतने आपला खेळ उंचावत सलग चार गुणांची कमाई केली. या आघाडीच्या बळावरच श्रीकांतने पहिला गेम जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये श्रीकांतने वर्चस्व गाजवले. स्मॅशच्या नऊ फटक्यांसह त्याने पोनसानाला निष्प्रभ केले. पोनसानाने दोन गुणांची आघाडी घेत सुरुवात केली, मात्र त्यानंतर श्रीकांतने आपल्या खेळात सुधारणा केली. सलग आठ गुण पटकावत श्रीकांतने दुसऱ्या गेमसह सामन्यावर कब्जा केला.
‘‘जेव्हा मी कोर्टवर उतरलो, तेव्हा मी शांत होतो. कुठलाही विचार माझ्या डोक्यात नव्हता. पोनसाना स्थानिक खेळाडू होता, त्यामुळे त्याला प्रेक्षकांचा पाठिंबा मिळणे साहजिक होते. तो जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असूनही जेतेपद पटकावण्याची ५०-५० टक्के संधी मला होती. मला सर्वोत्तम प्रदर्शन करायचे होते. एकेक गुणावर लक्ष केंद्रित करण्याचा माझा प्रयत्न होता. विशिष्ट दिवशी जो खेळाडू चांगला खेळतो त्यालाच यश मिळते, याची मला खात्री होती. संपूर्ण सामन्यात एकाग्रचित्ताने खेळण्यावर भर दिला. प्रेक्षकांचा भरपूर पाठिंबा असूनही पोनसन्ना दडपणाखाली असल्याचे मला जाणवत होते. या गोष्टीचा मी फायदा उठवला,’’ असे श्रीकांतने सांगितले.
तो पुढे म्हणाला, ‘‘जेतेपद पटकावले आहे, यावर अजूनही विश्वास बसत नाही. मी खूप उत्साहात आहे. मी कुटुंबीयांशी बोललो, माझ्या यशाने त्यांनाही खूप आनंद झाला आहे.’’
श्रीकांतने आशियाई कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. २०११मध्ये झालेल्या जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत श्रीकांतने उपउपांत्यपूर्व फेरीपर्यंत वाटचाल केली होती.
भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवत आहेत. गेल्याच वर्षी परुपल्ली कश्यपने लखनौ येथे झालेल्या सय्यद मोदी ग्रां. प्रि. गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.