कोपा अमेरिका फुटबॉल स्पध्रेत चिली आणि उरुग्वे यांच्यात होणाऱ्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीवर धुक्याचे सावट निर्माण झाले आहे. संपूर्ण शहरावर धुक्याचे ढग निर्माण झाल्यामुळे सहा वर्षांत पहिल्यांदा येथे ‘पर्यावरण आणीबाणी’ जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे बुधवारी (भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरुवारी पहाटे) होणाऱ्या या लढतीवर अनिश्चिततेचे ढग घोंगावत आहेत.
संपूर्ण शहराला धुक्याने वेढल्याने आणीबाणी म्हणून येथील व्यवसाय तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २४ तासांत हे धुक्याचे ढग कमी व्हावेत याकरिता शहरातील वाहनांना रस्त्यावर उतरण्यापासून मज्जाव करण्यात येत आहे. या अशा स्थितीत यजमान चिली संघ येथील इस्टाडिओ नॅसिओनल स्टेडियमवर बुधवारी गतविजेत्या उरुग्वेशी सामना करण्यासाठी सज्ज होत आहे.
‘‘ही बातमी आम्ही टीव्हीवर पाहत आहोत. मात्र, आम्हाला त्याविषयी काहीच प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. आम्ही येथे फुटबॉल खेळायला आलो आहोत,’’ असे मत उरुग्वे संघाचा कर्णधार डिएगो गॉडिन याने व्यक्त केले.
वेळ : गुरुवारी पहाटे ५ वाजता
थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स एचडी, सोनी किक्स