करोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ पुढे ढकलल्यानंतर आता यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी -२० वर्ल्डकप स्पर्धेबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे. देशात वाढत्या करोनानंतरही आयपीएलमधील बायो-बबल सुरक्षित असायला हवा होता, मात्र करोनाने त्यालाही भेदत खेळाडूंपर्यंत संपर्क साधला. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सुरक्षित जैव-सुरक्षित वातावरणाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

यंदाचा टी-२० वर्ल्डकप भारतात होणार आहे, मात्र या स्पर्धेला अजून ५ महिने बाकी आहेत. त्यामुळे बीसीसीआयचा असा विश्वास आहे, की या स्पर्धेची सक्तीच्या निलंबनांची शक्यता कमी आहे. आयपीएल दरम्यान आयसीसीची टीम भारत दौर्‍यावर येणार होती, परंतु करोनामुळे त्यांनी आपले वेळापत्रक रद्द केले. गेल्या आठवड्यात बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी यूएईला पर्यायी स्थळ म्हणून कायम राखण्यात आले आहे.

देशात करोनाची दुसरी लाट सुरू आहे आणि गेल्या काही दिवसांपासून दर दिवशी करोनाची भारतात साडेतीन लाख प्रकरणे येत असून सुमारे ३००० लोक रोज मरण पावत आहेत. जर परिस्थिती सुधारली नाही तर, प्रथमच भारत देशाबाहेर आंतरराष्ट्रीय स्पर्धा किंवा मालिका आयोजित करेल.

बीसीसीआयने यापूर्वी तीनदा परदेशात आयपीएलचे आयोजन केले आहे. यात २००९मध्ये दक्षिण आफ्रिका, २०१४ आणि २०२०मध्ये यूएईला आयपीएल स्पर्धा खेळवण्यात आली होती. यावर्षीही यूएईमध्ये आयपीएल आयोजित करण्याची चर्चा होती, पण बीसीसीआयच्या एका गटाने हा प्रस्ताव नाकारला आणि ही स्पर्धा भारतात आयोजित करण्याचे ठरविले.