सर्वोच्च न्यायालयाने भलेही एन. श्रीनिवासन यांना दिलासा दिला नसला, तरी रविवारी होणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळा(बीसीसीआय)च्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत ते पुनरागमन करण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे, तत्पूर्वी ही मंडळाची अखेरची कार्यकारिणीची बैठक असल्यामुळे त्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने बीसीसीआयने नेमलेल्या आयपीएल चौकशी समितीला ‘बेकायदेशीर आणि घटनाबाह्य’ ठरवले होते. या निर्णयाविरोधात बीसीसीआयने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने सदर सुनावणी पुढे ढकलल्यामुळे श्रीनिवासन यांना मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी श्रीनिवासन आणि बीसीसीआय यांना नोटिसा पाठविण्यात आल्या असून, पुढील सुनावणी ११ सप्टेंबरला होणार आहे.
पुढील महिन्यात होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा उद्देश समोर ठेवून श्रीनिवासन रविवारी होणाऱ्या कार्यकारिणी सभेचे अध्यक्षस्थान भूषवतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. या बैठकीत बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या तारखा आणि स्थळ निश्चित होणार आहे, असे बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी सांगितले. वार्षिक सर्वसाधारण सभा ३० सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे.

‘‘मला याविषयी कोणतीही कल्पना नाही. या बैठकीसंदर्भात कृपया मला काहीही विचारू नये. हा गुंतागुंतीचा आणि नाजूक विषय आहे. रविवारीच तुम्हाला सारे स्पष्ट होईल!’’
      -जगमोहन दालमिया,
         बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्ष