भारताऐवजी संयुक्त अरब अमिरातीला यजमानपद मिळण्याची शक्यता

नवी दिल्ली : देशातील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १४वा हंगाम मध्यातच स्थगित करण्यात आल्याने आता ऑक्टोबरमध्ये भारतातच होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भारतात त्यादरम्यानच्या काळात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे ही स्पर्धा खेळवली जाऊ शकते.

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत १६ संघांमध्ये विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. परंतु भारतातील सद्य:स्थिती आणि भविष्यातील आव्हानांचा विचार करता अन्य संघ विश्वचषकासाठी भारतात येण्यास नकार दर्शवण्याचीच शक्यता सर्वाधिक आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेसुद्धा (बीसीसीआय) तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) जून महिन्यात होणाऱ्या बैठकीदरम्यान विश्वचषकाच्या यजमानपदाविषयीचा अंतिम निर्णय घेणे अपेक्षित आहे.

‘‘आयपीएलचा हंगाम अर्धवटच स्थगित करावा लागल्याने भारतात विश्वचषकाचे आयोजन करणे धोक्याचे ठरू शकते, असे चित्र आहे. त्याशिवाय ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान करोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत. त्यामुळे विश्वचषकाच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी ‘बीसीसीआय’ स्वीकारणार असली, तरी ही स्पर्धा अमिराती येथे खेळवण्याचा पर्याय सध्या उत्तम ठरेल,’’ असे मत ‘बीसीसीआय’च्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने व्यक्त केले. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड यांसारखे बलाढय़ देश भारतात विश्वचषकाचे आयोजन करण्याच्या विरोधात आहेत, अशी माहितीही ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी दिली.

‘‘अमिरातीतील दुबई, शारजा आणि अबू धाबी ही शहरे जवळ अंतरावर असून त्यासाठी खेळाडूंना विमानाने प्रवास करावा लागणार नाही. त्याशिवाय तेथे करोनाग्रस्तांची संख्या अन्य देशांच्या तुलनेत कमी असल्याने विश्वचषकात सहभागी होणारे संघ अमिरातीच्या पर्यायाला नक्की पसंती देतील,’’ असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.