मुकुंद धस
गतवर्षीच्या संघातील सात खेळाडूंचा यंदाही संघात समावेश असल्याने अनुभवी महाराष्ट्राच्या मुलींचा संघ रविवारपासून राजस्थानातील उदयपूर येथे सुरू होणाऱ्या ३५व्या कुमार (१६ वर्षांखालील) राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत पदकजिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. १८ वर्षांखालील गटात खेळण्याचा अनुभव असलेल्या सुझान, आभा लाड, सिया देवधर यांच्यावर महाराष्ट्राची भिस्त असणार असून त्यांना श्रुती भोसले, देवश्री आंबेगावकर आणि पूर्वी महाले यांची साथ लाभेल. गटात पश्चिम बंगाल आणि पंजाब या तुलनेत दुबळ्या असलेल्या संघाना पराभूत करून मुलींचा संघ उपांत्यपूर्व फेरीत सहज प्रवेश करण्याची शक्यता आहे. संघ अनुभवी आणि समतोल असल्याने अनेक वर्षांपासून हुलकावणी दिलेल्या पदकाला यंदा गवसणी घालण्याची सुवर्णसंधी महाराष्ट्राच्या मुली वाया घालवणार नाहीत, अशी अपेक्षा आहे.
मुलांना मात्र बलाढय़ पंजाब, हरयाणा, तामिळनाडू, उत्तर प्रदेश संघांशी झुंजावे लागणार असून वरिष्ठ विभागातील आपले स्थान कायम ठेवण्यासाठी त्यांना किमान एका विजयाची आवश्यकता आहे. रविवारी रात्री महाराष्ट्राच्या मुलांचा सामना तामिळनाडूविरुद्ध होणार असून मुलींचा पहिला सामना सोमवारी होईल. गतवर्षी हैदराबाद येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींना सातव्या तर मुलांना नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.
आठवडाभर रंगणाऱ्या या स्पर्धेत २९ मुले आणि २७ मुलींचे संघ सहभागी होणार असून गतवर्षीच्या कामगिरीनुसार त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे.
वरिष्ठ विभागाचे सामने लाकडी पृष्ठभाग असलेल्या बंदिस्त स्टेडियममध्ये तर कनिष्ठ विभागाचे सामने परिसरातील दोन सिमेंटच्या मैदानावर होणार आहेत. अंतिम सामने ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी खेळवण्यात येणार असल्याची माहिती बास्केटबॉल महासंघाच्या तांत्रिक समितीचे अध्यक्ष नॉर्मन आयझॅक यांनी दिली.
सुरुवातीच्या गटवार साखळी सामन्यानंतर वरिष्ठ विभागाच्या दोन्ही गटांतील तळाचे संघ कनिष्ठ गटात फेकले जाणार असून कनिष्ठ विभागातील दोन सर्वोच्च संघांना वरिष्ठ विभागात प्रवेश मिळवून बाद फेरीत खेळता येणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 30, 2018 12:59 am