पुढच्या वर्षी भारतात १७ वर्षांखालील गटाचा विश्वचषक होणार आहे. या स्पर्धेत भारताचा सर्वोत्तम संघ सहभागी व्हावा या हेतूने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने प्रतिभाशोध कार्यक्रम हाती घेतला आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) सहकार्याने फुटबॉल महासंघाने हा उपक्रम हाती घेतला आहे. १७ वर्षांखालील विश्वचषक सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात होणार आहे.

‘ओएसपी’ असे नामकरण झालेल्या उपक्रमानुसार दुबईत १० आणि ११ जून रोजी मैदानावर चाचणी आयोजित करण्यात आली आहे. दुबई आणि परिसरात राहणारे आणि २००० आणि २००१मध्ये जन्मलेले खेळाडू या चाचणीसाठी पात्र असतील. भारतीय पारपत्र असणाऱ्या खेळाडूंसाठी ही चाचणी असणार आहे. भारताचे माजी कर्णधार आणि महासंघाच्या प्रतिभाशोध कार्यक्रमाचे संचालक अभिषेक यादव या उपक्रमाचे प्रमुख असणार आहेत.

दुबई येथील चाचणी सत्रानंतर ऑनलाइन व्हिडीओ व्यवस्थापन व्यासपीठ तयार करण्यात येणार आहे. भारताबाहेर राहणाऱ्या खेळाडूंनी स्वत:च्या खेळण्याचा व्हिडीओ सादर करणे आवश्यक आहे. व्यवस्थापन चमू या व्हिडीओंचे परीक्षण करणार असून, ठरावीक खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंना त्यांच्याc देशात मैदानावरील चाचणीसाठी बोलावले जाईल.

यादव यांच्यासह १७ वर्षांखालील प्रशिक्षक निकोलाई अ‍ॅडम खेळाडूंची तंत्रकौशल्याचे सखोल परीक्षण करणार असून, त्यानंतर ठरावीक खेळाडूंचा भारतीय संघासाठी विचार केला जाणार आहे.