मलेशियातील क्वालालंपूर रंगलेल्या १९ वर्षांखालील आशियाई क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानने धक्कादायक निकालाची नोंद करत क्रिकेटच्या मैदानात नव्या अध्यायाला सुरुवात केली. रविवारी रंगलेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला एकहाती नमवत त्यांनी क्रिकेटमधील पहिली मोठी स्पर्धा जिंकली. अफगाणिस्तानच्या इकरम अलीच्या नाबाद १०७ धावा आणि मुजीबने घेतलेल्या पाच विकेट्सच्या जोरावर अफगाणिस्तानने पाकिस्तानला तब्बल १८५ धावांनी पराभूत केले.

पाकिस्तानी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीरांनी चांगली सुरुवात करुन दिल्यानंतर इकरम अलीने मैदानात तग धरत नाबाद १०७ धावांची खेळी केली. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर अफगाणिस्तानने निर्धारित ५० षटकांत ७ बाद २४८ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला पाकिस्तानी संघ मुजीबच्या गोलंदाजीवर हतबल ठरला. परिणामी पाकिस्तानी संघ २२.१ षटकांत अवघ्या ६३ धावांवर गारद झाला.

अफगाणिस्तानकडून इकरम अलीशिवाय सलामीवीर रहमान गुल (४०) आणि इब्राहिम जरदार (३६) यांनी संघाच्या धावसंख्येत मोलाची भर घातली. तर पाकिस्तानकडून मोहम्मद मुसाने सर्वाधिक तीन बळी मिळवले. इकरम अलीचे शतक सार्थक ठरवण्यासाठी आणि अफगाणिस्तानला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यासाठी मुजीबने पाच तर अहमदने तीन बळी टिपले. मुजीबने सलामीवीर मोहम्मद अरीफ (४), शाद खान (७), शाहिन आफ्रिदी (३) तर ओमेर युसूफ आणि मोहम्मद शफाकत यांना शून्यावर तंबूचा रस्ता दाखवला. मालिकेत सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या मुजीबला मालिकावीर तर शतकी खेळी करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या यष्टीरक्षक इकरम अलीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.