गतविजेत्या भारताला १९ वर्षांखालील आशिया कपमधून मंगळवारी गाशा गुंडाळावा लागला. नेपाळपाठोपाठ बांगलादेशनही टीम इंडियाचा पराभव केला आहे. बांगलादेशने भारतावर आठ विकेट्सने मात करत आशिया कपच्या सेमी फायनलमध्ये धडक दिली.

मंगळवारी १९ वर्षांखालील आशिया कपमध्ये भारताचा सामना बांगलादेशशी होता. क्वालालांपूर येथे पावसाच्या हजेरीमुळे सामना ३२ षटकांचा खेळवण्यात आला. बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताला ३२ षटकांत १८७ धावांवर रोखण्यात बांगलादेशला यश आले. भारताची सुरुवात अत्यंत निराशाजनक होती. पृथ्वी शॉ आणि शुभम गिल या सलामीवारांना अर्धशतकी भागीदारीही रचता आली नाही. आघाडीचे चार फलंदाज अवघ्या ७१ धावांमध्ये माघारी परतल्याने संघाची अवस्था बिकट झाली. मात्र अनूज रावतच्या ३४ धावांच्या खेळीने संघाला सावरले.

भारताचे १८८ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशची सुरुवात दमदार होती. सलामीवीर पिनाक घोष आणि मोहम्मद नईम शेख यांनी ८२ धावांची भागीदारी केली. शेख बाद झाल्यावर घोषने मोहम्मद तवहिद ह्रिदोयच्या साथीने संघाला विजयाच्या समीप नेले.
लागोपाठ दोन पराभवांमुळे भारतीय संघाचे आशिया कपमधील आव्हान संपुष्टात आले आहे. आता अ गटातून नेपाळ आणि बांगलादेश हे दोन संघ सेमी फायनलमध्ये पोहोचले आहेत. तर ब गटातून पाकिस्तानसह अफगाणिस्तानने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला.

प्रशिक्षक राहुल द्रविडने या पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे. मी या पराभवामुळे निराश आहे. पण खचलेलो नाही. आम्ही नवीन खेळाडूंना संघात संधी देऊन २०१८ मध्ये होणाऱ्या अंडर-१९ वर्ल्डकपसाठी सर्वोत्तम संघ तयार करु असे त्याने सांगितले. अशा स्पर्धांमध्ये निकालापेक्षा खेळाडूचे तंत्र, शैली आणि मानसिकता ओळखणे महत्त्वाचे असते, असे द्रविडने नमूद केले.