*   तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा १० धावांनी विजय
*   पाकिस्तानचे निर्भेळ मालिका विजयाचे स्वप्न भंगले
*   धोनी सामनावीर; जमशेद मालिकावीर

नवऱ्याने छळले, पावसाने झोडपले, राजाने मारले तर तक्रार कोणाकडे करायची, असेच काहीसे भारतीयांचे झाले होते. कारण ज्या संघाने विश्वचषक जिंकवून दिला त्याच संघाला आपल्याच मातीत पाकिस्तानसारख्या कट्टर प्रतिस्पध्र्याशी पराभूत होताना सहनही होत नव्हते आणि सांगताही येत नव्हते. देशवासीयांची नाचक्की झालेली होती. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये भारतीय संघ चेन्नई आणि कोलकात्यामध्ये नापास ठरला होता आणि मालिकाही गमावली होती. त्यामुळे फिरोझशाह कोटलावरच्या सामन्यातही भारतीय संघ पराभवाचे पाढे वाचणार, असे बऱ्याच जणांना अपेक्षितच होते. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय फलंदाज निष्प्रभ ठरल्यावर तर यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले होते, कारण १६८ धावांचे लक्ष्य पाकिस्तानसाठी सोपे वाटत होते; पण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, जिथे विजय आणि पराभवाची बाजू कधीही बदलू शकते आणि तेच या सामन्यातही पाहायला मिळाले. भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत पाकिस्तानच्या फलंदाजांना धारातीर्थी पाडले, क्षेत्ररक्षकांनी दर्जेदार कामगिरी करत पाकिस्तानच्या धावांवर वचक ठेवला अन् अनपेक्षितपणे विजयाची माळ भारताच्या गळ्यात पडली. मालिका गमावली असली तरी अखेरचा सामना १० धावांनी जिंकत भारतीय संघाने लाज वाचवली आणि शेवटही गोड केला. पाकिस्तानचे मात्र निर्भेळ मालिका विजयाचे स्वप्न मात्र या पराभवाने भंग पावले. धोनीला सामनावीराचा, तर मालिकेत दोन शतक झळकावणाऱ्या नासिर जमशेदला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
१६८ धावांचे आव्हान पाकिस्तानसाठी फारसे अवघड नव्हते, पण भुवनेश्वर कुमार आणि शामी अहमद या दोघांनीही अप्रतिम मारा करीत फलंदाजांना चांगलेच झुंजवले. या दोघांनी पहिल्या ११ षटकांत फक्त २२ धावा दिल्या. कुमारने या वेळी पहिलाच स्पेल १० षटकांचा टाकत ३१ धावा देत दोन बळी टिपले. या चांगल्या सुरुवातीचा फायदा अन्य गोलंदाजांनीही चांगलाच उचलला आणि पाकिस्तानवर वचक ठेवण्यात त्यांना यश आले. ठरावीक फरकाने पाकिस्तानच्या संघाला धक्का देत भारतीय संघ विजयाच्या उंबरठय़ावर पोहोचला. अखेरच्या चार षटकांमध्ये २४ धावा पाकिस्तानला हव्या असल्या तरी जायबंदी मोहम्मद हाफिझ (२१) आणि उमर गुल (११) पाकिस्तानचे आशास्थान होते, पण इशांत शर्माने ४७ व्या षटकात गुलचा काटा काढला, पण हाफिझ मात्र खेळपट्टीवर उभाच होता. इशांतच्याच ४९व्या षटकात दोन चौकार मारत हाफिझने पाकिस्तानला विजयाची आशा दाखवली खरी, पण इशांतने त्याच षटकात हाफिझला बाद करत भारताच्या पदरात विजयाचे दान टाकले. इशांतने या वेळी सर्वाधिक तीन बळी मिळवले, तर कुमार आणि अश्विन यांनी दोन बळी घेत त्याला चांगली साथ दिली.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाज पुन्हा एकदा पाकिस्तानच्या भेदक माऱ्यापुढे १६७ धावांमध्ये ढेपाळले. अजिंक्य रहाणेने (४) आठव्या चेंडूंवर चौकार मारत चांगली सुरुवात केली खरी, पण त्यानंतर त्याला एकही धाव करता आली नाही. त्यानंतर मैदानात गौतम गंभीर (१५) आणि विराट कोहली (७) या दिल्लीकर जोडीकडून मोठय़ा अपेक्षा होत्या. युवराजने फलंदाजीला आल्यावर पहिल्या दोन्ही चेंडूंवर चौकार ठोकत भारतीयांना आशा दाखवली. युवराजने (२३) सुरेश रैनासह (३१) भारतीय संघाला स्थैर्य देण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. मोहम्मद हाफिझने युवराजला त्रिफळा उडवत ही जोडी फोडली. मग मैदानात आलेल्या धोनीला प्रेक्षकांकडून चांगलाच पाठिंबा मिळाला. गेल्या दोन्ही सामन्यांत त्याने भारतातर्फे सर्वाधिक धावा केल्या होत्या. या सामन्यातही त्याने भारतीय संघातर्फे सर्वाधिक ३६ धावा केल्या खऱ्या, पण संघाला दोनशे धावांचा टप्पा त्याला गाठून देता आला नाही. रवींद्र जडेजाने (२७) अखेपर्यंत किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला, पण पाकिस्तानच्या अचूक माऱ्यापुढे त्यालाही जास्त धावा जमवता आल्या नाहीत. पाकिस्तानच्या गोलंदाजीचे जेवढे कौतुक करावे तेवढेच थोडेच आहे. या सामन्यातही त्यांच्या गोलंदाजीत शिस्त पाहायला मिळाली. मोहम्मद इरफान आणि जुनैद खान यांनी अप्रतिम पहिले स्पेल टाकत भारताच्या पहिल्या तीन फलंदाजांना तंबूत धाडले. त्यानंतर फिरकीपटू सईद अजमलने कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत २४ धावांत भारताचा अर्धा संघ गारद केला.

धावफलक
भारत : गौतम गंभीर झे. उमर अकमल गो. इरफान १५, अजिंक्य रहाणे झे. कामरान अकमल गो. इरफान ४, विराट कोहली झे. युनूस खान गो. खान ७, युवराज सिंग त्रि. गो. हाफिझ २३, सुरेश रैना पायचीत गो. अजमल ३१, महेंद्रसिंग धोनी झे. उमर अकमल गो. गुल ३६, आर. अश्विन पायचीत गो. अजमल ०, रवींद्र जडेजा झे. उमर अकमल गो. अजमल २७, भुवनेश्वर कुमार पायचीत गो. अजमल २, इशांत शर्मा झे. व गो. अजमल ५, शामी अहमद नाबाद ०, अवांतर १७, एकूण ४३.४ षटकांत सर्व बाद १६७.
बाद क्रम : १-१९, २-२९, ३-३७, ४-६३, ५-१११, ६-१११, ७-१३१, ८-१४१, ९-१६०, १०-१६७.
गोलंदाजी : मोहम्मद इरफान ७-१-२८-२, जुनैद खान ९-१-१७-१, उमर गुल ८-१-४५-१, मोहम्मद हाफिझ १०-०-४४-१, सइद अजमल ९.४-१-२४-५.
पाकिस्तान : नासिर जमशेद पायचीत गो. अश्विन ३४, कामरान अकमल पायचीत गो. भुवनेश्वर कुमार ०, युनूस खान त्रिफळा गो. कुमार ६, मिसबाह उल हक झे. रहाणे गो. अश्विन ३९, उमर अकमल यष्टीचीत धोनी गो. जडेजा २५, शोएब मलिक पायचीत गो. शर्मा ५, मोहम्मद हाफीझ झे. युवराज गो. शर्मा २१, उमर गुल झे. जडेजा गो. शर्मा, सईद अजमल झे. धोनी गो. शामी अहमद १, जुनैद खान धावचीत रैना ०, मोहम्मद इरफान नाबाद ०, अवांतर १५, एकूण ४८.५ षटकांत सर्व बाद १५७
बाद क्रम : १-३, २-१४, ३-६१, ४-११३, ५-११९, ६-१२५, ७-१४४, ८-१४५, ९-१४५, १०-१५७
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार १०-२-३१-२, शामी अहमद ९-४-२३-१, इशांत शर्मा ९.५-०-३६-३, आर. अश्विन १०-१-४७-२, रवींद्र जडेजा १०-२-१९-१