प्रशांत केणी, लोकसत्ता

आठवडय़ाची मुलाखत – नामदेव शिरगावकर, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सहसचिव

मुंबई : ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आणि अनेक जागतिक स्पर्धा पुढे ढकलल्याने आंतरराष्ट्रीय क्रीडापटूंना त्याचा गंभीर फटका बसला आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणारे ऑलिम्पिक अनपेक्षित निकालांचे आणि विक्र मांचे असेल, असे मत भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सहसचिव नामदेव शिरगावकर यांनी व्यक्त के ले.

‘‘टोक्योत जुलै २०२१मध्ये होणारे ऑलिम्पिक प्रेक्षकांविनाच होण्याची दाट शक्यता आहे. प्रेक्षकांचे दडपण बाळगणाऱ्या क्रीडापटूंना मुक्त वातावरणात कामगिरी दाखवता येईल, तर प्रेक्षकांच्या प्रेरणेने कामगिरी उंचावणाऱ्या खेळाडूंना मात्र ते आव्हानात्मक ठरेल,’’ असे शिरगावकर यांनी सांगितले. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ यांसारख्या जनजागृतीच्या उपक्रमात शासनाने क्रीडापटूंनाही सामील करून घ्यावे, असे आवाहन ‘इंडिया तायक्वांदो’ संघटनेचे अध्यक्ष शिरगावकर यांनी केले. करोना साथीचा काळ आणि क्रीडापटूंसमोरील आव्हाने याबाबत शिरगावकर यांच्याशी के लेली खास बातचीत-

* ऑलिम्पिक लांबणीवर पडल्याने क्रीडा क्षेत्रावर काय परिणाम होईल?

जे ऑलिम्पिकसाठी आधीच पात्र ठरले आहेत, त्यांना सरावासाठी अधिक वेळ मिळणार आहे; पण पात्र न ठरलेल्यांनाही सरावाचा वेळ मिळाला असला तरी त्यांच्यासाठी हा कठीण काळ आहे. भारतात करोना रुग्णांची संख्या जास्त असल्याने सराव सुविधा उशिराने उपलब्ध होत आहेत. मात्र अनेक देशांमध्ये त्या आधीच उपलब्ध झाल्यामुळे त्यांना पात्रतेची संधी अधिक असू शकते.

* करोनाच्या साथीमुळे क्रीडा क्षेत्राचे अर्थकारण बदलले आहे का?

क्रीडा क्षेत्राचे अर्थकारण पूर्णत: बदलले आहे. ‘आयपीएल’ क्रि के टचे प्रातिनिधिक उदाहरण घेतले तरी यातील पुरस्कर्ते, जाहिराती हे उत्पन्न घटले आहे. प्रेक्षकांशिवाय होत असलेल्या या स्पर्धेवर झालेला परिणाम सहज स्पष्ट होतो. अन्य क्रीडाप्रकारांबाबत सांगायचे तर स्पर्धाचे गणित पुरस्कर्ते आणि शासनाचे अनुदान यावर अवलंबून असते. त्यामुळे क्रीडा संघटना अडचणीत सापडल्या आहेत. याशिवाय वर्षभराच्या स्पर्धाची बक्षिसे आणि कामगिरीद्वारे उत्पन्न मिळणाऱ्या क्रीडापटूंसाठी हा संघर्षांचा काळ आहे. काही मार्गदर्शकांनी ऑनलाइन प्रशिक्षणाचा मार्ग पत्करला. ऑनलाइन प्रक्रि येत कसे करायचे हे दाखवता येते; परंतु चुका सुधारता येत नाहीत. उपजीविकेचे साधन असणाऱ्या प्रशिक्षकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. याशिवाय क्रीडा साहित्य उद्योगावरही याचा मोठा परिणाम झाला आहे.

* आंतरराष्ट्रीय क्रीडापटूंपुढे टाळेबंदी शिथिलीकरण होत असताना कशा प्रकारे आव्हान आहे?

स्पर्धाच नसल्याने क्रीडापटूंची मानसिक स्थिती गंभीर आहे. क्रीडापटू मैदानावर सराव किं वा कामगिरी करीत असतो, त्या वेळी सर्व आव्हानांसाठी सज्ज असतो; पण टाळेबंदीत त्यांचे आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण झाले आहे. ऑलिम्पिक आणि जागतिक स्पर्धाच्या पात्रतेसाठी क्रीडापटूंना वेळ आणि सुविधा कमी मिळणार आहे, या वास्तविकतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. याचप्रमाणे दुखापतग्रस्त क्रीडापटूंना सावरण्याची या काळात संधी मिळाली आहे. जलतरणपटूंना दुबईत सरावाला पाठवले आहे, हे सकारात्मक आहे. प्रमाणित कार्यपद्धतीचा वापर करून व्यायामशाळा सुरू होत आहेत, याचेसुद्धा स्वागत करायला हवे.

* करोनानंतरच्या काळात मोठय़ा  किंवा छोटय़ा क्रीडा संघटना आणि क्रीडापटूंना सावरणे किती कठीण जाईल?

मोठय़ा क्रीडा प्रकारांचे तितके च मोठे अर्थकारण असते आणि छोटय़ा क्रीडा प्रकारांचे छोटे अर्थकारण असते. करोनाची आपत्ती आल्यानंतर कसे सामोरे जायचे, याबाबत क्रीडा संघटना, क्रीडापटू आणि शासन या कुणाकडेच योजना तयार नव्हती, हे मान्य करू या. त्यामुळे या सर्वच घटकांना त्याचा फटका बसला आहे; पण आता टाळेबंदी शिथिलीकरणाच्या तरी योग्य योजना आपल्याकडे आहेत का? पुढील काही काळ आपल्याला करोनाचे आव्हान पेलतच जगावे लागणार आहे. त्यामुळे कोविड चाचण्यांचे बंधन असेल, अनावश्यक व्यक्तींना स्पर्धास्थळी मज्जाव असेल.

*  अमेरिका, फ्रोन्समध्ये ग्रँडस्लॅम स्पर्धा झाल्या. परदेशात फु टबॉल लीग सुरू आहेत, तर अमिरातीमध्ये ‘आयपीएल’ही सुरू आहे; पण भारतात मात्र क्रीडा स्पर्धाना अद्याप परवानगी मिळालेली नाही, याचे तुमचे कसे विश्लेषण कराल?

जागतिक पातळीवरील क्रीडा प्रकारांची भारताशी अशा प्रकारे तुलना करणे कठीण आहे. कारण लोकसंख्या, पायाभूत सुविधा आणि तेथील सरकारची नियमावली हे प्रमुख घटक महत्त्वाचे ठरतात. जैवसुरक्षित वातावरण परदेशात उत्तम प्रकारे राबवले जाते, कारण नियमावलींचे काटेकोर पालन तिथे के ले जाते. भारतात ते अशक्य नाही, परंतु आव्हानात्मक नक्की आहे. त्यामुळेच सर्वाधिक उलाढाल असलेल्या जागतिक क्रीडा स्पर्धामध्ये गणल्या जाणाऱ्या ‘आयपीएल’चे आयोजनही भारताबाहेर करावे लागले.