विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला अॅडलेड कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तिसऱ्या दिवशी घडलेल्या नाट्यमय घडामोडींमध्ये भारताचा दुसरा डाव अवघ्या ३६ धावांत संपला. ८ गडी राखून भारतावर मात करत ऑस्ट्रेलियाने ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. सोशल मीडियावर भारतीय चाहते संघाच्या कामगिरीवर नाराज असताना माजी खेळाडू सुनिल गावसकर यांनी मात्र पराभवासाठी फलंदाजांना दोष देणं योग्य ठरणार नाही असं म्हटलं आहे.

अवश्य वाचा – It hurts ! निराशाजनक पराभवानंतर विराट कोहलीची प्रतिक्रिया

“कोणताही संघ इतक्या कमी धावसंख्येवर बाद होताना पाहणं फारसं चांगलं नाही. पण भारताऐवजी या जागेवर दुसरा संघ असता तर त्याचीही अशीच परिस्थिती झाली असती. कदाचीत तो संघ ३६ नाही पण ७०-७२ मध्ये नक्कीच बाद झाला असता. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी सुरेख गोलंदाजी केली, या पराभवासाठी भारतीय फलंदाजांना दोष देणं योग्य ठरणार नाही.” गावसकर Channel 7 ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

अवश्य वाचा – द्रविडला प्रशिक्षक नेमा, लाजिरवाण्या कामगिरीनंतर चाहते रवी शास्त्रींवर भडकले

दरम्यान, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताने आपली निच्चांकी धावसंख्याही यादरम्यान नोंदवली. विजयासाठी मिळालेलं ९० धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी सहज पूर्ण केलं. मॅथ्यू वेड आणि बर्न्स यांनी पहिल्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी करत संघाच्या विजयाची पायाभरणी केली. जो बर्न्सने नाबाद ५१ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

अवश्य वाचा – क्या से क्या हो गए देखते देखते; अवघ्या चार तासांत अ‍ॅडलेड कसोटीचा निकाल, भारताचा दारुण पराभव

.