भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह-उल-हक यांची तुलना करणे अयोग्य ठरेल, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने व्यक्त केले आहे.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील मानहानीकारक पराभवानंतर धोनी आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत पराभूत झाल्याने मिसबाह यांना कर्णधारपदावरून हटवावे, अशी मागणी टीकाकार आणि माजी खेळाडू करीत आहेत. याबाबत एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना मलिक म्हणाला की, ‘‘दोन्ही कर्णधारांसाठी मालिका चांगली गेली नसली तरी या दोन्ही कर्णधारांची तुलना होऊ शकत नाही. धोनीने आतापर्यंत आयसीसीची बरीच अजिंक्यपदे जिंकली आहेत, तर मिसबाहने अजून आयसीसीचे एकही अजिंक्यपद पटकावलेले नाही, त्यामुळे या दोघांची तुलना करता येऊ शकत नाही.’’
मलिक पुढे म्हणाला की, ‘‘मिसबाह हा एक चांगला कर्णधार असून त्याने फलंदाजीमध्येही दमदार कामगिरी केली आहे. पण आगामी विश्वचषकासाठी कर्णधार कोण असावा, याचा निर्णय पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) घ्यायला हवा. आताच हा निर्णय घेतला तर नवनियुक्त कर्णधाराचा आत्मविश्वास वाढेल.’’
‘‘पहिला कसोटी सामना गमावल्यावर पाकिस्तानने गोलंदाजीच्या रणनीतीमध्ये कोणताही बदल केला नाही, भारतानेही पराभवानंतर रणनीतीमध्ये कोणताही बदल केला नाही आणि त्यामुळेच त्यांच्या पदरी पराभव पडले. पहिला सामना गमावल्यावर रणनीतीमध्ये बदल करून सकारात्मक वृत्तीने दोन्ही संघांनी मैदानात उतरायला हवे होते,’’ असे मलिकने सांगितले.