लंडन : भारतीय क्रिकेट संघ विराट कोहलीवर फार अवलंबून आहे, हे म्हणणे योग्य ठरणार नाही, असे मत श्रीलंकेचे माजी कर्णधार कुमार संगकारा यांनी व्यक्त केले आहे.

तयारीच्या अभावामुळे भारताने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने गमावले, याबाबत क्रिकेटजगतामध्ये चर्चा रंगली आहे. भारताची फलंदाजी या पराभवांचे प्रमुख कारण असून, एकटा कोहलीच इंग्लिश गोलंदाजांचा समर्थपणे सामना करीत आहे. याबाबत संगकारा म्हणाला, ‘‘गेल्या काही वर्षांत कोहली ज्या पद्धतीने फलंदाजी करतो आहे, तेच सातत्य त्याने टिकवले आहे. त्याची फलंदाजी पाहणे, ही उत्तम अनुभूती असते. मात्र भारतीय संघात अन्यसुद्धा चांगले खेळाडू आहेत. त्यामुळे कोहलीवर हा संघ फार अवलंबून आहे, असे विधान करणे अयोग्य ठरेल.’’

संगकारा आपल्या मताचा विस्तार करताना म्हणाले, ‘‘पुजारा आणि रहाणे हे शैलीदार फलंदाज आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये पुजाराची सरासरी ५० धावांनजीक आहे. रहाणेची परदेशांमधील खेळपट्टय़ावरील सरासरी ५० धावांहून अधिक आहे. याशिवाय लोकेश राहुल, मुरली विजय, शिखर धवन, दिनेश कार्तिक हेसुद्धा उत्तम फलंदाज आहेत.’’