इंडियन बॅडमिंटन लीगला प्रारंभ होण्यापूर्वीच वादविवादांनी घेरले आहे. आधारभूत किंमत कमी करण्याच्या मुद्दय़ावरून ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांची नाराजी चर्चेत असतानाच आता रूपेश कुमार आणि सनावे थॉमस जोडीची नाराजी आयबीएलने ओढवून घेतली आहे.
  पूर्वकल्पना न देता आधारभूत किंमत कमी करण्यात आल्याने नाराज झालेल्या या अनुभवी जोडीने पहिल्यावहिल्या आयबीएलमधून माघारीचे संकेत दिले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर अव्वल १५ जोडय़ांमध्ये धडक मारण्याची कामगिरी नावावर असलेल्या या जोडीला पुणे पिस्टॉन्स संघाने प्रत्येकी ५,००० अमेरिकन डॉलर्सला खरेदी केले.
‘‘ज्या किमतीला आम्हाला खरेदी करण्यात आले, तो आकडा ऐकून मला धक्काच बसला. मला अत्यंत वाईट वाटले. करारानुसार आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, थॉमस चषक, सुपर सीरिज स्पर्धा यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या वरिष्ठ भारतीय खेळाडूंची आधारभूत किंमत १५,००० अमेरिकन डॉलर्स ठरवण्यात आली होती. पण त्यानंतर काय घडले मला माहिती नाही,’’ असे रूपेश कुमारने सांगितले.
‘‘साधारणपणे मी कमी बोलतो. पण या मुद्यावर शांत बसणे मला शक्य नाही. ‘स्पोर्टी सोल्युशन्स’ने मला करारपत्र पाठवले. त्यावर स्वाक्षऱ्या करून परत पाठवण्यास त्यांनी सांगितले. पण आता काय करायचे मला कळत नाही, ’’ असे तो पुढे म्हणाला.
याच मुद्दय़ावरून रुपेशचा पुरुष दुहेरीतील सहकारी सनावे थॉमस यानेही नाराजीचा सूर आळवला आहे. ‘‘१५,००० अमेरिकन डॉलर्सच्या करारावर मी स्वाक्षरी केली. मात्र त्यानंतर आमची आधारभूत किंमत ५,००० अमेरिकन डॉलर्स करण्यात आल्याचे मला प्रसारमाध्यमांद्वारे कळले. हे मान्य करणे खरेच कठीण आहे,’’ अशा शब्दांत सनावेने आपल्या भावना प्रकट केल्या.