केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी संसदेत आपला चौथा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी जेटली यांनी विविध क्षेत्रांमध्ये तरतूदींसह काही योजना देखील जाहीर केल्या. क्रीडा मंत्रालयासाठी ३५० कोटींची वाढीव तरतूद करण्यात आली असली आहे. गेल्या वर्षी क्रीडा मंत्रालयासाठी १५९२ कोटींची तरतूद करण्यात आली होती. तित वाढ होऊन आता ही तरतूद १९४३ कोटी इतकी झाली आहे. मात्र, क्रिकटेतर खेळांमधील स्थानिक पातळीवर खेळाडूंना निधी अभावी संधी मिळत नसल्याची ओरड होत असताना अर्थसंकल्पात युवा खेळाडूंसाठीच्या तरतूदीमध्ये निराशाच पदरी पडली आहे. कारण, खेळातील गुणवत्ता शोधण्यासाठी फक्त ५० लाखांचा अतिशय तुटपुंजा निधी जाहीर करण्यात आला आहे.

 

पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्येही भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली असतानाही देशात दिव्यांग खेळांना प्रोत्साहनासाठी दिल्या जाणाऱया तरतूदीमध्ये केलेली धक्कादयक घट करण्यात आली आहे. गेल्या वर्षी दिव्यांग खेळांना प्रोत्सहनासाठी केलेली चार कोटींची तरतूद कमी करून थेट एक लाखावर आणण्यात आली आहे.

राष्ट्रीय क्रीडा संघटनांना मात्र ३०२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर भारतीय क्रीडा प्राधिकरणाला ४८१ कोटींचा निधी जाहीर करण्यात आला आहे. गेल्या वर्षी क्रीडा प्राधिकरणाला ४१६ कोटींची तरतूद करण्यात आली होती. जम्मू-काश्मीरमधील खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी मागील अर्थसंकल्पात केलेली ७५ कोटींची तरतूद याही अर्थसंकल्पात कायम ठेवण्यात आली आहे.