क्रीडा क्षेत्रात ‘खेलो इंडिया’सारखे नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या केंद्र सरकारने २०१९-२०२० सालासाठी सादर केलेल्या अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी २१४.२० कोटींची वाढ केली. त्याचबरोबर भारतीय क्रीडा प्राधिकरणाला (साइ)देण्यात येणारा निधी आणि खेळाडूंना मिळणाऱ्या प्रोत्साहनपर भत्त्यातही वाढ करण्यात आली आहे.

अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात (२०१९-२०२०) क्रीडा क्षेत्रासाठी २२१६.९२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गेल्या वर्षीच्या (२०१८-१९) अर्थसंकल्पात ही तरतूद २००२.७२ कोटी रुपये इतकी होती.

अंतरिम अर्थसंकल्पाचा सर्वात मोठा फायदा हा भारतीय क्रीडा प्राधिकरणाला होणार आहे. राष्ट्रीय क्रीडा विकास निधी (एनएसडीएफ) आणि अन्य निधींमध्ये भरघोस वाढ करण्यात आल्यामुळे आता खेळाडूंनाही मिळणाऱ्या प्रोत्साहनपर भत्त्यात वाढ होणार आहे. ‘साइ’ला मिळणाऱ्या निधीत ५५ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली असून ती ३९५ कोटींवरून ४५० कोटी इतकी करण्यात आली आहे. ‘साइ’ ही क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च संस्था असून राष्ट्रीय शिबिरांचे आयोजन, खेळाडूंना उपकरणे पुरवणे तसेच अन्य प्रमुख बाबी या ‘साइ’मार्फत केल्या जातात.

एनएसडीएफसाठीचा निधी २ कोटी रुपयांनी वाढवण्यात आला असून तो ७० कोटी रुपये इतका करण्यात आला आहे. अर्थमंत्र्यांनी खेळाडूंना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनपर भत्त्यातही वाढ केली असून हा निधी ६३ कोटी रुपयांवरून ८९ कोटी रुपये इतका वाढवण्यात आला आहे. राष्ट्रीय क्रीडा संघटनांना (एनएसएफ) देण्यात येणाऱ्या निधीत किंचितशी कपात करण्यात आली असून हा निधी २४५ कोटी इतका करण्यात आला आहे.

खेळाडूंना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांच्या रकमेसाठीचा निधी ९४.०७ कोटी रुपयांनी वाढवण्यात आला आहे. गेल्या वर्षी खेळाडूंना ३१६.९३ कोटी रुपये बक्षिसांपोटी देण्याची तरतूद होती, तो आता ४११ कोटी रुपये इतका करण्यात आला आहे.