* पीएसव्हीकडून पराभूत, ल्युक शॉ जखमी * माद्रिद, पीएसजी, युव्हेंट्सची सलामी
युएफा चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेतील मँचेस्टर युनायटेड क्लबचे पुनरागमन वेदनादायी ठरले. ‘ब’ गटातील सलामीच्या सामन्यात युनायटेडला १-२ अशा फरकाने पीएसव्ही क्लबने पराभूत केले, यामधील वेदनादायी बाब म्हणजे त्यांचा अनुभवी खेळाडू ल्युक शॉ याच्या पायाला फ्रॅक्चर झाले आणि त्यामुळे त्याला पुढील लढतीला मुकावे लागणार आहे. बुधवारी झालेल्या इतर लढतींमध्ये रिआल माद्रिद, पॅरिस सेंट जर्मेन, युव्हेंट्स आणि अ‍ॅटलेटिको माद्रिद यांनी विजयी सलामी दिली.
विंगर मेम्फिस डेपेयच्या (४१ मि.) गोलमुळे आघाडी मिळवूनही युनायटेडला विजय साकारता आला नाही. हेक्टर मोरेनो (४५+ मि.) व ल्युसिआनो नरसिंग (५७ मि.) यांच्या गोलने पीएसव्हीला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, सामन्याच्या १५व्या मिनिटाला मोरेनोने चेंडू हिसकावण्याठी शॉच्या वाटेत अडथळा निर्माण करून त्याला पाडले. या प्रसंगानंतर मैदानावर पडलेला शॉ प्रचंड वेदनांनी तळमळत होता. आठ मिनिटांच्या उपचारानंतर त्याला ऑक्सिजन मास्क लावून रुग्णालयात नेण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार शॉच्या पायाला दुहेरी फ्रॅक्चर झाले आहे. ‘‘ड्रेसिंग रूममध्ये शॉला ऑक्सिजन मास्क लावून नेण्यात आले आणि त्या वेळी तो रडत होता. तो कधी बरा होईल हे सांगू शकत नाही. दुहेरी फ्रॅक्चर बरे होण्यासाठी साधारण सहा महिन्यांचा कालावधी लागतो,’’ असे युनायटेडचे व्यवस्थापक लुईस व्ॉन गाल यांनी सांगितले.

रोनाल्डोचा विक्रम
ख्रिस्तियानो रोनाल्डाने हॅट्ट्रिकची नोंद करताना चॅम्पियन्स लीग स्पध्रेत सर्वाधिक गोल करण्याच्या लिओनेल मेस्सीच्या विक्रमाला मागे टाकले. रोनाल्डोने तीन गोल करून रिअल माद्रिदला शख्तार डोनेत्सक क्लबवर ४-० असा दणदणीत विजय मिळवून दिला. माद्रिदसाठी करिम बेंझेमाने (३० मि.) गोलची बोहनी केली होती. त्यानंतर रोनाल्डोने (५५, ६३ व ८१ मि.) गोलधडाका लावून सर्वाधिक ८० गोल्सचा विक्रम बनवला. मेस्सी (७७) दुसऱ्या स्थानावर आहे.

इतर निकाल
’मँचेस्टर सिटी १ (जिऑर्जीओ चिएलीनी ५७ मि. स्वयंगोल) पराभूत वि. युव्हेंट्स २ (एम. मँडजुकीस ७० मि. व अल्व्हारो मोराटा ८१ मि.)
’पॅरिस सेंट जर्मेन २ (एंजल डी मारिया ४ मि. व एडिसन कवानी ६१ मि.) विजयी वि. मॅल्मो एफएफ ०
’सेव्हिल्ला ३ (केव्हीन गॅमेइरो ४७ मि., एव्हर बॅनेगा ६६ मि. व येव्हेन कोनोप्लांका ८४ मि.) विजयी वि. बोरुसिया मॅग्लॅडबॅच ०
’गॅलटासाराय ० पराभूत वि. अ‍ॅटलेटिको माद्रिद २ (अँटोने ग्रिएजमॅन १८ व २५ मि.)