लंडन ऑलिम्पिकनंतर जवळपास एक वर्षांने जमैकाच्या युसेन बोल्टचा वेगवान अविष्कार विश्व अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत पाहायला मिळाला. चित्त्याच्या वेगाने धाव घेत बोल्टने लुझनिकी स्टेडियमवरील सर्वानाच अचंबित केले. बोल्टने १०० मीटरचे अंतर ९.७७ सेकंदांत पार करत आपणच वेगाचा सम्राट असल्याचे सिद्ध केले.
जमैका पॉवेल, टायसन गे हे अव्वल खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यानंतर यंदाची विश्वविजेतेपदाची लढत बोल्ट, अमेरिकेचा जस्टिन गॅटलिन आणि जमैकाचा नेस्टा कार्टर यांच्यातच होती. उपांत्य फेरीत धीम्या गतीने सुरुवात करणाऱ्या बोल्टने अंतिम फेरीत मात्र कोणतीही चूक केली नाही. त्याने २००४च्या अ‍ॅथेन्स ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता गॅटलिन आणि त्याचा सहकारी कार्टर यांना लिलया मागे टाकत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली.
बोल्टपाठोपाठ गॅटलिनने १०० मीटरचे अंतर ९.८५ सेकंदांत पार करत रौप्यपदक पटकावले. कार्टरने कांस्यपदक मिळविताना ९.९५ सेकंद वेळ नोंदविली. केमार व निकेल यांनी अनुक्रमे चौथे व पाचवे स्थान मिळवित जमैकाचे वर्चस्व गाजविले.
  या शर्यतीमधील अंतिम फेरीत बोल्ट व कार्टर यांच्याबरोबरच जमैकाच्या केमार बेली-कोल व निकेल अ‍ॅशमेड यांनीही स्थान मिळविले होते. त्यामुळेच शर्यतीची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. उपांत्य फेरीत बोल्टपेक्षा गॅटलिन याची कामगिरी चांगली होती. शर्यतीच्या प्रारंभापासूनच वेगात सातत्य ठेवत बोल्टने आघाडी घेतली. त्याने ही शर्यत जिंकून त्याने विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील सहाव्या सुवर्णपदकाची नोंद केली. त्याने ऑलिम्पिकमध्येही दोन वेळा शंभर व दोनशे मीटर शर्यत जिंकली आहे. या शर्यतींमधील सुवर्णपदकांसह त्याने ऑलिम्पिकमध्ये सहा सुवर्णपदके जिंकली आहेत.