भारताने इंग्लंडपाठोपाठ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतही थाटात सुरुवात केली. मात्र इंग्लंडने पुढील दोन्ही सामने जिंकून भारताकडून कसोटी मालिका हिरावून घेतली. आता पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर दणक्यात विजय मिळवून भारताने आघाडी घेतली खरी, पण ही आघाडी, बिघाडी तर ठरणार नाही ना, याची भीती सर्वाना वाटू लागली आहे. हैदराबाद येथे शनिवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून आघाडी मजबूत करण्याचा भारतीय संघाचा इरादा असून मालिकेत बरोबरी साधण्यासाठी मायकेल क्लार्कच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघ उत्सुक आहे.
कर्णधार महेंद्रसिंग धोनीची धडाकेबाज फलंदाजी आणि ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विनने त्याच्या तोडीस तोड केलेली गोलंदाजी यामुळे भारताने पाहुण्या ऑस्ट्रेलियाला चेन्नई कसोटीत चारी मुंडय़ा चीत केले. मात्र इंग्लंड संघाने ज्या पद्धतीने पुनरागमन केले, त्याची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी भारतीय संघाला घ्यावी लागेल.
उप्पल येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम भारतासाठी लकी ठरले असून या मैदानावरील गेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर एक डाव आणि ११५ धावांनी दणदणीत विजय साकारला होता. अश्विन आणि प्रग्यान ओझा यांनी वर्चस्व गाजविल्यामुळे हा सामना चार दिवसांतच भारताने जिंकला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियावरही हुकमत गाजवण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. हा सामना जिंकून भारताने २-० अशी आघाडी घेतल्यास, ऑस्ट्रेलिया संघ ‘बॅकफूट’वर ढकलला जाईल तसेच त्यांना या मालिकेत पुनरागमन करणे कठीण जाणार आहे.
दुसऱ्या कसोटीत फिरकीपटू प्रग्यान ओझाला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. मुरली विजय आणि वीरेंद्र सेहवाग हे चेन्नई कसोटीत सपेशल अपयशी ठरले असले तरी हे दोघेच सलामीला उतरतील, असे संकेत धोनीने दिले आहेत. मधल्या फळीतील फलंदाजांना कायम ठेवल्यास, कुणाच्या जागी ओझाला संधी द्यायची, हा प्रश्न संघ व्यवस्थापनाला सतावणार आहे. रवींद्र जडेजाने पाच विकेट्स मिळवत अश्विनला चांगली साथ दिली होती. पहिल्या डावात अपयशी ठरलेल्या हरभजन सिंगने दुसऱ्या डावात डेव्हिड वॉर्नर आणि मॅथ्यू वॅड यांचे महत्त्वाचे बळी मिळवले होते. त्यामुळे यापैकी एकाला डच्चू द्यायचा की चौथ्या फिरकीपटूचा संघात समावेश करायचा, याचा विचार संघ व्यवस्थापन करत आहे. तसे झाल्यास, वेगवान गोलंदाज इशांत शर्मा किंवा भुवनेश्वर कुमार यांच्यापैकी एकाला वगळण्यात येईल.
हैदराबादमधील खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी पोषक असल्याने ऑस्ट्रेलिया संघ दुसऱ्या फिरकीपटूला संधी देण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे नॅथन लिऑनच्या जोडीला झेवियर डोहर्टीचा समावेश निश्चित मानला जात आहे. पीटर सिडल किंवा मिचेल स्टार्क यांच्यापैकी एकाची जागा तो घेईल. मधल्या फळीतील फलंदाजांना अद्याप सूर न गवसल्याने ऑस्ट्रेलिया संघात बरेच बदल होण्याची शक्यता आहे.
 फिलिप ह्युजेसच्या जागी उस्मान ख्वाजाला संधी मिळाल्यास, शेन वॉटसन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरेल. मोझेस हेन्रिक्सने पहिल्या कसोटीत दोन्ही डावांत चांगली फलंदाजी केल्याने त्याच्याकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा क्लार्कला आहे.

प्रतिस्पर्धी संघ :
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, हरभजन सिंग, प्रग्यान ओझा, इशांत शर्मा, अशोक दिंडा, भुवनेश्वर कुमार.
ऑस्ट्रेलिया : मायकेल क्लार्क (कर्णधार), ईडी कोवन, डेव्हिड वॉर्नर, फिल ह्युजेस, शेन वॉटसन, मॅथ्यू वॅड, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल जॉन्सन, पीटर सिडल, मिचेल स्टार्क, नॅथन लिऑन, मोझेस हेन्रिक्स, जेम्स पॅटिन्सन, झेवियर डोहर्टी, जॅक्सन बर्ड, उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथ.
सामन्याची वेळ : सकाळी ९.३० वा.पासून
थेट प्रक्षेपण : स्टार क्रिकेट, स्टार स्पोर्ट्स.