News Flash

अखेरच्या स्थानावर उरुग्वेची मोहोर

पुढील वर्षी ब्राझीलमध्ये रंगणाऱ्या फिफा विश्वचषकाची रणधुमाळी सुरू झाली असून फुटबॉलच्या या महाकुंभमेळ्यासाठी आता ३२ संघ पात्र ठरले आहेत.

| November 22, 2013 03:41 am

पुढील वर्षी ब्राझीलमध्ये रंगणाऱ्या फिफा विश्वचषकाची रणधुमाळी सुरू झाली असून फुटबॉलच्या या महाकुंभमेळ्यासाठी आता ३२ संघ पात्र ठरले आहेत. आशियातील दुबळ्या जॉर्डनविरुद्धचा दुसऱ्या टप्प्यातील सामना गोलशून्य बरोबरीत सोडवत उरुग्वेने फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरणारा उरुग्वे हा ३२वा संघ ठरला आहे.
गेल्या आठवडय़ात पहिल्या टप्प्यातील सामन्यात उरुग्वेने जॉर्डनचा ५-० असा धुव्वा उडवत फिफा विश्वचषकातील स्थान जवळपास निश्चित केले होते. माँटेव्हिडियोच्या खच्चाखच भरलेल्या प्रसिद्ध सेन्टेनरिओ स्टेडियमवर उरुग्वे संघ मोठय़ा फरकाने सामना जिंकेल, असे वाटले होते. उरुग्वेने पहिल्या सत्रात चेंडूवर अधिक वेळ ताबा मिळवला, मात्र जॉर्डनचा भक्क बचाव त्यांना भेदता आला नाही. जॉर्डनने दुसऱ्या सत्रात उरुग्वेला गोल करण्यासाठी झुंजवले. पण विश्वचषकाचे स्थान पक्के होत असल्याची खात्री पटू लागल्यानंतर उरुग्वेने खेळाडूंना दुखापती होऊ नयेत, यासाठी आक्रमक खेळ करणे टाळले. दिएगो गॉडिन, दिएगो लुगानो या उरुग्वेच्या खेळाडूंनी गोल करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळू शकले नाही.
दोन वेळा फिफा विश्वचषकाचे अजिंक्यपद पटकावणाऱ्या उरुग्वेने २०१०मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या गेल्या विश्वचषक स्पर्धेत चौथे स्थान पटकावले होते. दक्षिण अमेरिकन संघाने २०१०च्या स्पर्धेत मिळवलेले ते सर्वोत्तम स्थान होते.  उरुग्वेला सलग चौथ्यांदा फिफा विश्वचषकाच्या मुख्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी प्ले-ऑफ फेरीचा अडथळा पार करावा लागला. दक्षिण अमेरिकन गटातून यजमान ब्राझीलसह अर्जेटिना, कोलंबिया, इक्वेडोर आणि चिलीपाठोपाठ अंतिम फेरीत स्थान मिळवणारा उरुग्वे हा सहावा संघ ठरला.
उरुग्वेचा लुईस सुआरेझ, नेदरलॅण्ड्सचा रॉबिन व्हॅन पर्सी आणि बेलिझचा डिऑन मॅक्कॉले यांनी प्रत्येकी ११ गोल करत विश्वचषकाच्या पात्रता फेरीत सर्वाधिक गोल झळकावण्याचा मान पटकावला.

विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या ३२ संघांची खंडवार यादी
आफ्रिका : अल्जेरिया, कॅमेरून, घाना, आयव्हरी कोस्ट, नायजेरिया.
आशिया : ऑस्ट्रेलिया, इराण, जपान, दक्षिण कोरिया.
युरोप : बेल्जियम, बोस्निया-हर्जेगोविना, क्रोएशिया, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, इटली, स्पेन, नेदरलँण्ड्स, पोर्तुगाल, रशिया, स्वित्र्झलड.
उत्तर-मध्य अमेरिका आणि कॅरेबियन बेटे : कोस्टा रिका, होंडुरास, अमेरिका, मेक्सिको.
दक्षिण अमेरिका : अर्जेटिना, कोलंबिया, इक्वेडोर, चिली, उरुग्वे, ब्राझील (यजमान).

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2013 3:41 am

Web Title: uruguay become the last team to qualify for 2014 world cup
टॅग : Football
Next Stories
1 इंग्लंडसाठी ‘ब्रॉड’ दिवस
2 एमएसएसएकडून पृथ्वी शॉ याला हॅरिस व गाइल्स शिल्डची प्रतिकृती देणार
3 संक्षिप्त : वॉवरिंका चेन्नई टेनिस स्पर्धेत खेळणार
Just Now!
X