उरुग्वे फुटबॉल असोसिएशनने मुख्य प्रशिक्षक ऑस्कर ताबारेझ यांच्यासह आपल्या सर्व ४०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. करोनामुळे सध्या जगातील क्रीडाक्षेत्र थांबले असताना उरुग्वे फुटबॉल संघटना (एयूएफ) मोठय़ा आर्थिक संकटात सापडले आहे.

‘‘सध्याच्या आरोग्य आणीबाणीमुळे क्रीडाविषयी सर्व घडामोडी थांबल्या असताना आम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत. संघटनेचे कार्य सुरू राहण्यासाठी आम्हाला काही जणांना कामावरून काढावे लागत आहे. त्याचबरोबर संघटनेबाहेरील व्यक्तींचे करारही रद्द करण्यात येत आहेत,’’ असे ‘एयूएफ’च्या पत्रकात म्हटले आहे. २००६पासून प्रशिक्षकपदाची भूमिका निभावणाऱ्या ७३ वर्षीय ताबारेझ यांनी उरुग्वे संघाला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचवले होते तर कोपा अमेरिका स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले होते.

उरुग्वेमध्ये करोनाची बाधा झालेले चार जण आढळून आल्यानंतर १३ मार्चपासून फुटबॉलच्या सर्व स्पर्धा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्या आहेत. उरुग्वेमध्ये सध्या करोनाचे २७४ रुग्ण आढळले आहेत.