पहिल्या सामन्यातील पराभव.. लुइस सुआरेझने संघात पुनरागमन करून साकारलेला इंग्लंडविरुद्धचा विजय.. ‘गोलसाठी काहीही’ या आवेशात सुआरेझने घेतलेला चावा.. त्यानंतर इटलीवर मिळालेला विजय.. सुआरेझवर घातलेली बंदी.. या साऱ्या आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर झुलत एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखे अखेर पहिला विश्वविजेता उरुग्वेचा संघ बाद फेरीत दाखल झाला आहे. बाद फेरीत आता त्यांच्यापुढे आव्हान असेल ते कडवे प्रतिस्पर्धी कोलंबियाचे.
उरुग्वेसाठी सुआरेझ यंदाच्या विश्वचषकात यशस्वी ठरला होता. कारण तो नसताना पहिल्या सामन्यात उरुग्वेला पराभव स्वीकारावा लागला होता. इंग्लंडविरुद्ध संघात आल्यावर त्याने दोन गोल लगावत संघाला विजय मिळवून दिला आणि इटलीविरुद्धही तो खेळताना उरुग्वेने बाजी मारली होती. त्यामुळे आता बाद फेरीत कोलंबियाविरुद्ध खेळताना सुआरेझचे संघात नसणे उरुग्वेसाठी धोकादायक ठरू शकते. गेले दोन सामने उरुग्वेची भिस्त त्याच्यावरच होती. पण आता त्याच्या नसण्याने संघाचे मनोबल खालावलेले असेल. पण तरीही त्यांच्याकडे दिएगो फोर्लान, एडिसन काव्हानीसारखे दर्जेदार खेळाडू आहेत आणि त्यांच्यावरच आता उरुग्वेची भिस्त असेल.
कोलंबियाने साखळी फेरीत ग्रीस, आयव्हरी कोस्ट आणि जपान या संघांना पराभूत करीत दिमाखात बाद फेरीतील स्थान निश्चित केले आहे. जेम्स रॉड्रिगेझ हा त्यांच्या यशाचा शिल्पकार ठरला असून त्याने या साखळी फेरीतील तिन्ही सामन्यांमध्ये गोल केले आहेत. साखळी फेरीतील विजयांनी त्यांचा आत्मविश्वास दुणावलेला असला तरी त्यांना साखळी फेरीमध्ये मोठय़ा संघाला तोंड द्यावे लागले नव्हते, पण उरुग्वेसारख्या संघाचे आव्हान कोलंबिया कसे पेलणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
दोन्ही संघांचा फॉर्म आणि मनोबलाचा विचार केल्यास उरुग्वेपेक्षा कोलंबियाचे पारडे किंचितसे जड दिसत आहे. पण मोठय़ा सामन्यांचा अनुभव असलेला उरुग्वेच्या संघाची या सामन्यात जादू चालणार का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.
सामना क्र. ५०
उरुग्वे वि. कोलंबिया
स्थळ : इस्टाडिओ माराकना, रिओ दी जानिरो ल्ल वेळ : मध्यरात्री १.३० वा. पासून
लक्षवेधी खेळाडू
जेम्स रॉड्रिगेझ (कोलंबिया) : कोलंबियाच्या २२ वर्षांच्या जेम्स रॉड्रिगेझने विश्वचषकातील साखळी फेरीतील तिन्ही सामन्यांमध्ये गोल करीत साऱ्यांचीच मने जिंकली आहेत. मधल्या फळीत खेळणाऱ्या जेम्सने आक्रमक खेळ करीत प्रतिस्पध्र्यावर आपली दहशत निर्माण केली आहे, हाच त्याचा फॉर्म उरुग्वेविरुद्धच्या सामन्यातही कायम राहतो का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

एडिसन काव्हानी (उरुग्वे) : लुइस सुआरेझ कोलंबियाविरुद्धच्या सामन्यात खेळणार नसल्यामुळे आता साऱ्यांचे लक्ष उरुग्वेच्या एडिसन काव्हानीकडे लागले असेल. विश्वचषकातील कोस्टा रिकाविरुद्धच्या पहिल्या सामन्यामध्ये उरुग्वेकडून एडिसनने एकमेव गोल केला होता. त्यानंतरच्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याची कामगिरी लक्षणीय असून त्याच्यावर मुख्यत्वेकरून उरुग्वेची भिस्त असेल.

गोलपोस्ट
आतापर्यंत आमची कामगिरी लक्षणीय असली तरी आम्हाला बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. त्यामुळे कामगिरीमध्ये सातत्य राखण्याचा आमचा प्रयत्न असेल. आतापर्यंतच्या विजयामुळे संघाचे मनोबल कमालीचे उंचावलेले आहे, आत्मविश्वासही दुणावला आहे. उरुग्वेविरुद्धच्या सामन्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत.
– जॅकसन मार्टिनेझ, कोलंबिया

जर एका खेळाडूवर बंदी असेल तर त्याच्या जागी दुसरा खेळाडू खेळवण्यात येईल. लुइस सुआरेझविना आम्ही बरेच सामने खेळले आहेत, त्यामधील बरेचसे सामने आम्ही जिंकले आहेत, त्यामुळे तो खेळणार नसल्याचे संघावर दडपण नसेल. आम्ही खास रणनीतीनुसार कोलंबियाशी दोन हात करायला सज्ज झालो आहोत.
ऑस्कर ताराबेझ, उरुग्वे