नोव्हाक जोकोव्हिच उपांत्यपूर्व फेरीत
एकीकडे उष्माघात आणि दुसरीकडे एकामागून एक बसणारे धक्के हे यंदाच्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे वैशिष्टय़ ठरत असले तरी दुसरीकडे दमदार खेळ करीत जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित खेळाडू नोव्हाक जोकोव्हिचने अमेरिकन खुली टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीकडे वाटचाल केली आहे. महिलांमध्ये एक अनोखी लढत पाहायला मिळणार असून सेरेना व व्हीनस या विल्यम्स भगिनी उपांत्यपूर्व फेरीत समोरासमोर येणार आहेत.
या स्पर्धेत २०११ मध्ये विजेतेपद मिळविणाऱ्या जोकोव्हिचने उपउपांत्यपूर्व फेरीत स्पेनच्या रॉबर्ट बॉटिस्टा अ‍ॅगुटवर ६-३, ४-६, ६-४, ६-३ अशी मात केली. त्याच्यापुढे स्पेनच्या फेलिसिनो लोपेझचे आव्हान असणार आहे. ३३ वर्षीय लोपेझने इटलीच्या फॅबिओ फोगनेनीचा ६-३, ७-६ (७-५), ६-१ असा पराभव केला. चौदाव्यांदा या स्पर्धेत भाग घेणाऱ्या लोपेझने प्रथमच या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
गतविजेत्या मेरिन सिलिकला उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सचा जो विल्फ्रेड त्सोंगाशी खेळावे लागणार आहे. सिलिकने फ्रान्सच्या जेरेमी चार्डीचे आव्हान ६-३, २-६, ७-६ (७-२), ६-१ असे संपुष्टात आणले. नवव्या मानांकित सिलिकने या स्पर्धेत सलग अकरा विजय मिळविले आहेत. १९ व्या मानांकित त्सोंगाने बिगरमानांकित खेळाडू बेनॉइट पिअरीवर ६-४, ६-३, ६-४ असा विजय मिळविला. ३० वर्षीय त्सोंगाने या स्पर्धेत सव्‍‌र्हिसवर ५६ गेम्स जिंकल्या आहेत.
जागतिक क्रमवारीतील अग्रमानांकित महिला खेळाडू सेरेनाने अमेरिकेच्याच मेडिसन केईसला ६-३, ६-३ असे पराभूत केले. सेरेनाने यंदा ऑस्ट्रेलियन, फ्रेंच व बिम्बल्डन तिन्ही गँ्रण्डस्लॅम स्पर्धेत जेतेपद मिळवले आहे. या स्पर्धेत विजेतेपद मिळविल्यास एकाच वर्षांत चारही ग्रॅण्ड स्लॅम जिंकण्याची किमया ती करू शकणार आहे. तिची बहीण व्हीनसने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान मिळविणाऱ्या अ‍ॅनेट कोन्ताव्हिट या इस्तोनियन खेळाडूची घोडदौड संपुष्टात आणली. व्हीनसने हा सामना ६-२, ६-१ असा जिंकला. तिने २०१० मध्ये अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती. त्यानंतर तिला एकाही ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत एवढी चांगली कामगिरी करता आलेली नाही. सेरेनाने आतापर्यंत या स्पर्धेतील सात विजेतेपदांसह कारकीर्दीत २२ ग्रॅण्ड स्लॅम विजेतेपदे मिळविली आहेत. सेरेना व व्हीनस यांच्यात आतापर्यंत झालेल्या २६ लढतींपैकी १५ लढतींमध्ये सेरेना विजयी झाली आहे. या स्पर्धेत त्यांच्यात चार वेळा गाठ पडली आहे. त्यापैकी दोन लढतीत सेरेना व दोन लढतीत व्हीनस विजयी झाली आहे.

महिला दुहेरीत सानियाची आगेकूच
भारताच्या सानिया मिर्झाने सहकारी मार्टिना हिंगिस हिच्या साथीत महिलांच्या दुहेरीत खेळताना उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. अग्रमानांकन लाभलेल्या या जोडीने मिचेला क्राजिसेक व बार्बरा स्ट्रायकोवा यांच्यावर ६-३, ६-० असा धडाकेबाज विजय मिळविला. त्यांच्यापुढे नवव्या मानांकित युंगजान चान व हाओ चिंग चान या चीन तैपेईच्या जोडीचे आव्हान असेल.