कोरिकचा धडाकेबाज विजय; जोकोव्हिच, ओसाका यांची उपउपांत्यपूर्व फेरीत मजल

न्यूयॉर्क : क्रोएशियाच्या बोर्ना कोरिक याने तब्बल सहा मॅचपॉइंट वाचवत तसेच १-५ अशा पिछाडीवरून दमदार मुसंडी मारत चौथ्या मानांकित स्टेपानोस त्सित्सिपास याला पराभवाचा धक्का दिला. अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिच आणि जपानची नाओमी ओसाका यांनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील आपापले सामने जिंकत विजयी घोडदौड कायम राखली आहे.

पाचव्या दिवशी त्सित्सिपास आणि कोरिक यांच्यातील तिसऱ्या फेरीच्या लढतीने टेनिसचाहत्यांची मने जिंकली. तब्बल साडेचार तास रंगलेल्या या सामन्यात कोरिकने पिछाडीवरून पुनरागमन करत त्सित्सिपासचा ६-७ (२/७), ६-४, ४-६, ७-५, ७-६ (७/४) असा पराभव केला. त्सित्सिपासला चौथ्या आणि पाचव्या सेटमध्ये विजयाची संधी मिळूनही त्याला पराभवाची चव चाखावी लागली. आता उपांत्यपूर्व फेरीत कोरिकची लढत ऑस्ट्रेलियाच्या जॉर्डन थॉम्प्सन याच्याशी होणार आहे.

तीन वेळा अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या जोकोव्हिचने जर्मनीच्या यान-लेनार्ड स्ट्रफ याच्यावर वर्चस्व गाजवले. जोकोव्हिचने हा सामना ६-३, ६-३, ६-१ असा सहज जिंकत चौथ्या फेरीत मजल मारली आहे. आता रविवारी रंगणाऱ्या पुढील लढतीत जोकोव्हिचला स्पेनच्या २०व्या मानांकित पाबलो कॅरेनो बस्टा याच्याशी दोन हात करावे लागतील. करोनाविषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल तीन तास विलंब झालेल्या तिसऱ्या फेरीच्या सामन्यात जर्मनीच्या पाचव्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्ह याने एड्रियन मनारिनो याच्यावर ६-७ (४/७), ६-४, ६-२, ६-२ असा विजय मिळवला.

चौथ्या मानांकित नाओमी ओसाका हिला विजयासाठी संघर्ष करावा लागला तरी तिने युक्रेनच्या १८ वर्षीय मार्ता कोस्तेयूक हिचे आव्हान ६-३, ६-७ (४/७), ६-२ असे परतवून लावले. आता ओसाकाची पुढील लढत इस्टोनियाच्या १४व्या मानांकित अ‍ॅनेट कोंटावेट हिच्याशी होणार आहे. चेक प्रजासत्ताकच्या पेट्रो क्विटोव्हा हिने अमेरिकेच्या जेसिका पेगुला हिला ६-४, ६-३ अशी सहज धूळ चारत चौथ्या फेरीत प्रवेश केला.

बोपण्णा-शापोलोव्ह दुसऱ्या फे रीत

भारताचा दुहेरीतील अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याचा कॅ नडाचा साथीदार डेनिस शापोवालोव्ह यांनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फे रीत मजल मारली आहे. बोपण्णा-शापोवालोव्ह यांनी अमेरिके च्या एर्नेस्टो एस्कोबेडो आणि नोआ रुबिन यांचा ६-२, ६-४ असा सहज पाडाव के ला. आता या जोडीला दुसऱ्या फे रीत सहाव्या मानांकित के व्हिन क्राविएट्झ आणि आंद्रेस मायेस यांच्याशी लढत द्यावी लागेल. सुमित नागल आणि दिविज शरण यांचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर आता भारताच्या आशा बोपण्णावर आहेत.