सुप्रिया दाबके

टेनिस जगतात पुरुषांमध्ये रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोव्हिच, राफेल नदाल यांचे, तर महिलांमध्ये सेरेना विल्यम्सचे वर्चस्व अबाधित होते. मात्र यंदाच्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीत जपानची नाओमी ओसाका आणि पुरुष एकेरीत ऑस्ट्रियाचा डॉमिनिक थिम यांनी विजेतेपद पटकावून हे समीकरण मोडीत काढले. त्यामुळे टेनिसमध्ये ओसाका, थिम यांच्यासारख्या युवा खेळाडूंचे नवे राज्य सुरू झाले आहे, असे म्हणायला हरकत नाही.

ओसाकाने अमेरिकन स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करत टेनिस जगतातील तिच्या चाहत्यांमध्ये भर घातली. मुखपट्टय़ांद्वारे सामाजिक संदेश देणारी ओसाका समाजमाध्यमांवर चांगलीच गाजली. फ्लॉइड लॉइड या कृष्णवर्णीयाच्या हत्येचा निषेध म्हणून तिने वर्णद्वेषी अत्याचाराला बळी पडलेल्या एकूण सात जणांच्या मुखपट्टय़ा यंदा अमेरिकन स्पर्धेत घातल्या. त्याच वेळेला खेळाची गुणवत्ताही तिने दाखवली. ओसाकाला स्वत:ला कृष्णवर्णीय म्हणून वाईट अनुभवाला कारकीर्दीत सामोरे जावे लागले नसले तरीही सामाजिकतेचे भान तिने जपले. यापुढे कोणालाही वर्णद्वेषाचा सामना करावा लागू नये, म्हणून टेनिसच्या व्यासपीठावरून जगाला संदेश देण्याचे ओसाकाने ठरवले. याबाबत ती म्हणते, ‘‘खेळाडूंनी राजकारणात न पडता फक्त मनोरंजन करावे, या विचारांचा मी निषेध करते. हा मानवी अधिकारांचा विषय आहे. मी स्वत: कृष्णवर्णीय आहे. त्यामुळे कृष्णवर्णीयांवर झालेल्या अत्याचारांबाबत मी नेहमी आवाज उठवणार!’’

ओसाकाने घातलेल्या या मुखपट्टय़ांबाबत अर्थातच मोठय़ा प्रमाणात चर्चा झाली. अनेकांनी ओसाकाचे याबाबत कौतुकही केले. जपानमध्ये ओसाकाच्या या कृत्याचे कौतुक करण्यात आले.  माजी टेनिसपटू मार्टिना नवरातिलोवाने ओसाकाची प्रशंसा करताना म्हटले की, ‘‘सेरेनासारखी क्षमता ओसाकामध्ये दिसते. न्यूयॉर्कच्या लोकांसमोर खेळणे सोपे नाही. यंदा प्रेक्षक नसले तरी याआधी २०१८ मध्ये अमेरिकन स्पर्धा जिंकताना ओसाकाने न्यूयॉर्कच्या प्रेक्षकांच्या टीकेला खेळाने गप्प केले होते. ही ताकद फक्त सेरेनामध्ये होती.’’

अंतिम सामन्यात ओसाकाने अंतिम फेरीत बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेंकाविरुद्ध पहिला सेट गमावला होता. मात्र त्यातूनही तिने दमदार पुनरागमन केले. २२ वर्षीय ओसाका आगामी काळातही टेनिसवर वर्चस्व गाजवेल, अशीच आशा तिच्या खेळातून दिसते आहे. २७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतून ओसाकाने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. त्यामुळे तिच्या जगभरातील चाहत्यांची मात्र निश्चित निराशा झाली आहे. अमेरिकेची सेरेना विल्यम्स एकीकडे २४व्या विश्वविक्रमी ग्रँडस्लॅम विजेतेपदासाठी प्रयत्नशील आहे.

पुरुष एकेरीत डॉमिनिक थिमने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. याआधी नदालकडून फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत थिमला २०१८ आणि २०१९ मध्ये पराभव पत्करावा लागला होता. या वर्षीदेखील ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत थिमला सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचकडून हार स्वीकारावी लागली होती. त्यामुळे ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पराभूत होणारा टेनिसपटू असा शिक्का थिमवर बसला होता. मात्र अमेरिकन स्पर्धा जिंकत एका दमात थिमने पराभवाचा शिक्का पुसला. याचप्रमाणे त्याच्यातील खिलाडूवृत्तीचेही त्याने दर्शन घडवले. ‘‘अंतिम फेरीतील प्रतिस्पर्धी अलेक्झांडर झ्वेरेव्हला मी नमवले असले तरी, त्याचा खेळ पाहता आम्ही दोघांनी विजेतेपद पटकावले आहे, असे म्हणेन. ग्रँडस्लॅम जिंकता आले म्हणजे आयुष्यातील ही सर्वात मोठी कमाई केली आहे,’’ अशी प्रतिक्रिया थिमने दिली. थिमच्या बाबतीत आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे तो ऑस्ट्रियाचा ग्रँडस्लॅम जिंकणारा दुसराच खेळाडू ठरला आहे.

थिमने अमेरिकन स्पर्धा जिंकून फेडरर, नदाल, जोकोव्हिच या महान त्रिकुटाच्या वर्चस्वाला आव्हान दिले आहे. अर्थातच फेडरर, नदाल हे अमेरिकन स्पर्धेत खेळले नाहीत आणि जोकोव्हिच चौथ्याच फेरीतून बाहेर झाला होता. फेडरर, नदाल, जोकोव्हिच या त्रिकु टाला विजेतेपदासाठी कडवे आव्हान देण्याची क्षमता आपल्यात असल्याचे थीमने गेल्या काही वर्षांत सिद्ध के ले आहे. येत्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत १९ ग्रँडस्लॅम विजेत्या नदालपुढे थिमचेच तुल्यबळ आव्हान असेल, अशी चर्चा रंगली आहे. मात्र लाल मातीवरील या स्पर्धेतही दोन वेळा उपविजेतेपद पटकावत थिमने त्याची गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्यामुळे थिम कामगिरीतील सातत्य कसे टिकवतो, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

supriya.dabke@expressindia.com