पाच वेळा विजेता ठरलेला रॉजर फेडरर आणि अव्वल महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्स यांनी आपल्या अमेरिकन ग्रँड स्लॅम अभियानाची सुरुवात झोकात केली. मात्र सिसी बेलिस आणि बोर्ना कोरिक या युवा टेनिसपटूंनी बलाढय़ प्रतिस्पध्र्याना नमवून खळबळ उडवून दिली.
१७ ग्रँड स्लॅम जेतेपदांना गवसणी घालणाऱ्या फेडररने या मोसमातील ५०व्या विजयाची नोंद केली. सलग ६०व्या ग्रँड स्लॅम स्पर्धेत खेळणाऱ्या फेडररने ऑस्ट्रेलियाच्या मारिन्को मॅटोसेव्हिकचा ६-३, ६-४, ७-६ (७/४) असा पराभव करत २४ दिवसांतील २३वा विजय मिळवला. फेडररला पुढील फेरीत ऑस्ट्रेलियाच्या सॅम ग्रोथ याचा सामना करावा लागेल. ‘‘तिसऱ्या सेटमध्ये मारिन्कोने चांगला खेळ करत मला कडवी लढत दिली. मारिन्कोचे भवितव्य उज्ज्वल आहे, असे मला वाटते,’’ असे फेडररने सांगितले.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सेरेनाने १८ वर्षीय टेलर टाउनसेंड हिचा ५५ मिनिटांत ६-३, ६-१ असा फडशा पाडला. पुढील फेरीत सेरेनाची गाठ वनिया किंग हिच्याशी पडणार आहे. सेरेनाने १९९९मध्ये जेव्हा अमेरिकन स्पर्धा जिंकली, त्यावेळी सिसी बेलिस ही पाच महिन्यांचीसुद्धा नव्हती. पण क्रमवारीत १२०८व्या स्थानी असलेल्या बेलिसने ऑस्ट्रेलियन स्पर्धेतील उपविजेत्या डॉमिनिका सिबुल्कोव्हा हिला ६-१, ४-६, ६-४ असा पराभवाचा धक्का दिला. अ‍ॅना कुर्निकोव्हा (१९९६) हिच्यानंतर अमेरिकन स्पर्धेत सामना जिंकणारी बेलिस ही सर्वात युवा खेळाडू ठरली आहे. ‘‘जिद्दीने लढा देण्याचे मी सुरुवातीपासूनच ठरवले होते. पण मी विजयी होईन, याचा विचारही केला नव्हता,’’ असे बेलिसने सांगितले.
पुरुषांमध्ये १७ वर्षीय कोरिकने चेक प्रजासत्ताकच्या लुकास रोसोल याचा ६-४, ६-१, ६-२ असा पराभव करून ग्रँड स्लॅम स्पर्धेत शानदार पदार्पण केले. विम्बल्डन विजेती पेट्रा क्विटोव्हा हिने फ्रान्सच्या क्रिस्तिना माडेनोव्हिक हिला ६-१, ६-० असे सहज हरवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. कॅनडाच्या सातव्या मानांकित युगेनी बौचार्ड हिने बेलारूसच्या ओल्गा गोवोत्र्सोव्हा हिला ६-२, ६-१ असे पराभूत केले. माजी फ्रेंच विजेत्या अ‍ॅना इव्हानोव्हिकने अमेरिकेच्या अ‍ॅलिसन रिस्के हिचा ६-३, ६-० असा पाडाव केला. २०११मध्ये अमेरिकन स्पर्धा जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या समंथा स्टोसूरने अमेरिकेच्या लॉरेन डेव्हिस हिच्यावर ६-१, ६-४ अशी मात केली. गतउपविजेती विक्टोरिया अझारेंकाने जपानच्या मिसाकी डोई हिच्यावर ६-७ (३/७), ६-४, ६-१ असा विजय मिळवला.
सानिया विजयी, बोपण्णा पराभूत
भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची झिम्बाब्वेची साथीदार कारा ब्लॅक यांनी महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत चेक प्रजासत्ताकची कॅरोलिना आणि ख्रिस्तिना या प्लिस्कोव्हा भगिनींचा ६-३, ६-० असा सहज पराभव करत ऑस्ट्रेलियन स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. रोहन बोपण्णा आणि त्याचा पाकिस्तानचा साथीदार ऐसाम उल-हक कुरेशी यांनी पुरुष दुहेरीच्या पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. १३व्या मानांकित बोपण्णा-कुरेशी जोडीला अडीच तासांपेक्षा अधिक वेळ रंगलेल्या या सामन्यात इटलीच्या डॅनियल ब्रासिआली आणि आंद्रेस सेप्पी यांच्याकडून ६-७ (१०/१२), ६-४, ६-७ (५/७) असा पराभव पत्करावा लागला.