२३ वेळा ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवलेल्या अमेरिकेच्या स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्सने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. ५ व्या मानांकित युक्रेनच्या एलिना स्विटोलिना हिला सेरेनाने ६-३, ६-१ असे पराभूत केले.

आधीच्या सामन्यात स्विटोलिनाने ज्या पद्धतीचा खेळ केला होता, त्यामुळे सेरेनाला ती जोरदार टक्कर देईल असे बोलले जात होते. पण सेरेनाने तिला सामन्यात डोके वर काढू दिले नाही. पहिला सेट जिंकताना तिला स्विटोलिनाने थोडीशी झुंज दिली. पण तिने तो सेट ६-३ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये तर स्विटोलिनाकडून अजिबातच झुंंज दिसली नाही. त्यामुळे सरळ दोन सेटमध्ये सेरेनाने सामना जिंकला आणि अंतिम फेरीत धडक मारली. या विजयासह सेरेनाने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

कारकीर्दीतील २४व्या ग्रँडस्लॅमच्या दिशेने कूच करणाऱ्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सपुढे अंतिम फेरीत १५ व्या मानांकित चेक प्रजासत्ताकच्या बियांका आंद्रेस्कू हिचे आव्हान असणार आहे.

दुसऱ्या उपांत्य लढतीत स्वित्झर्लंडच्या १३ वी मानांकित बेलिंडा बेंकिक हिला बियांकाने ७-६ (७-३), ७-५ असे पराभूत केले आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.