News Flash

US Open 2020: भारताचं आव्हान संपुष्टात; रोहन बोपन्ना पराभूत

दोन सरळ सेटमध्ये केला पराभव

US OPEN स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताचे आव्हान संपुष्टात आले. भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा कॅनडाचा सहकारी डेनिस शापोव्हालोव्ह यांना पुरूष दुहेरीमध्ये आपला गाशा गुंडाळावा लागला. नेदरलँड्सचा जीन-ज्युलियन रोजर आणि रोमानियाचा होरिया टेकू या जोडीने त्यांना दोन सरळ सेटमध्ये पराभूत केले.

सामन्याची सुरूवात दोन्ही जोड्यांसाठी महत्त्वाची होती. पण रोहन बोपन्ना-डेनिस जोडीला सुरूवातीपासूनच सामन्यावर पकड मिळवता आली नाही. जीन ज्युलियन रोजर- होरिया टेकू जोडीने अतिशय आक्रमक खेळ करत गुण मिळवायला सुरूवात केली. पहिला सेट त्यांनी ७-५ असा जिंकला. त्यानंतर दुसऱ्या फेरीत तरी बोपन्ना-डेनिस जोडीकडून तगडा संघर्ष पाहायला मिळेल अशी आशा होती. पण ती आशा फोल ठरली. पहिल्या सेटचीच पुनरावृत्ती दुसऱ्या सेटमध्ये झाली आणि पुन्हा ७-५ असा सेट जिंकत रोजर-टेकू जोडीने सामना जिंकला. या पराभवासोबतच भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

पुरूष एकेरीत भारताच्या आशेचा किरण असलेला सुमित नागलदेखील दोन दिवसांपूर्वी दुसऱ्याच फेरीत बाद झाला. स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत त्याने विजय मिळवला होता. २३ वर्षीय सुमितने अमेरिकेच्या ब्रॅडली क्लॅनला नमवून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला होता. गेल्या सात वर्षात ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात दुसऱ्या फेरीत पोहोचणारा सुमीत हा पहिलाच भारतीय ठरला होता. दुसऱ्या फेरीत ऑस्ट्रियाच्या थीएमशी त्याचा सामना रंगला. पण थीएमच्या अनुभवापुढे नागलचा संघर्ष फिका पडला. ६-३, ६-३, ६-२ अशा सरळ सेटमध्ये नागलचा पराभव झाला. या पराभवासोबतच एकेरीतील स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 9:50 am

Web Title: us open rohan bopanna denis shapovalov pair knocked out in quarter final indian challenge ends vjb 91
Next Stories
1 नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धा : स्पेनचा युक्रेनवर दमदार विजय
2 मुंबईच्या प्रशिक्षक पदांच्या मुलाखती उद्या
3 मराठमोळा प्रवीण तांबे गाजवतोय CPL, थरारक कॅच आणि भेदक मारा…पाहा हा व्हिडीओ
Just Now!
X