आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अमेरिकेच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झालेली आहे. नेपाळच्या किर्तीपूर शहरात सुरु असलेल्या ICC Men’s Cricket World Cup League 2 स्पर्धेत अमेरिकेचा संघ ३५ धावांत गारद झाला. आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर बाद होण्याचा नकोसा विक्रम आता अमेरिकेच्या संघावर जमा झालेला आहे.

नेपाळने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. झेविअर मार्शल या फलंदाजाचा अपवाद वगळता एकही अमेरिकन फलंदाज दोन आकडी धावसंख्या गाठू शकला नाही. संदीप लामिच्छाने आणि सुशान भारीने अमेरिकेचा संपूर्ण संघ गुंडाळला. संदीपने ६ तर सुशानने ४ बळी घेतले.

प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या नेपाळच्या संघाची सुरुवातही खराब झाली होती. कर्णधार ग्यानेंद्र मल्ला आणि सुभाष खाकुरेल हे नॉस्टुश केंजिगेच्या गोलंदाजीवर झटपट माघारी परतले. यानंतर पारस खडका आणि दिपेंद्र सिंह आयरेने फटकेबाजी करत सहाव्या षटकातच नेपाळच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.