मूळचा भारतीय असणाऱ्या जसकरण मल्होत्राने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६ चेंडूंमध्ये ६ षटकार मारण्याचा पराक्रम केलाय. दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्सनंतर एकदिवसीय सामन्यांमध्ये एकाच षटकामध्ये ६ षटकार लगावणारा तो जगातील केवळ दुसरा क्रिकेटपटू ठरलाय. अमेरिकेकडून खेळताना जसकरणने पापुआ न्यू गिनीविरुद्धच्या सामन्यात ५० व्या षटकामध्ये ही भन्नाट कामगिरी केली. त्याने १७३ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने १६ षटकार आणि ४ चौकार लगावले. म्हणजेच त्याने केवळ २० चेंडूंमध्ये ११२ धावा कुटल्या.

मूळचा पंजाबमधील असणाऱ्या जसकरणचा हा केवळ सातवा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता. या सामन्यामध्ये या ३१ वर्षीय खेळाडूने तुफान फटकेबाजी केली. या सामन्याआधी त्याची सर्वोच्च धावसंख्या अवघी १८ इतकी होती. शेवटच्या षटकामध्ये त्याने गाउडी टोका या गोलंदाजाला एकापाठोपाठ एक सहा षटकार लगावले. जसकरण पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याने १२४ चेंडूंमध्ये १७३ धावांची खेळी केली. अमेरिकेने नऊ गड्यांच्या मोबदल्यात २७१ धावा केल्या. पापुआ न्यू गिनीच्या संघाला १३७ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यांनी हा सामना १३४ धावांनी गमावला. दोन सामन्यांची मालिका अमेरिकेने २-० अशी जिंकली.

जसकरण मल्होत्राआधी गिब्सने हा कारनामा केलाय. त्याने २००७ मध्ये एकदिवसीय सामन्यामध्ये नेदरलँड्सविरुद्ध खेळताना ही कामगिरी केलेली. भारताचा माजी फलंदाज युवराज सिंहनेही २००७ मध्ये टी २० विश्वचषकामध्ये अशीच कामगिरी केलेली. युवराजने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला एका षटकामध्ये सहा षटकार लगावले होते. याच वर्षी मार्च महिन्यामध्ये वेस्ट इंडीजच्या कायरन पोलार्डने श्रीलंकेविरुद्ध खेळताना टी २० सामन्यामध्ये एका षटकात सहा षटकार लगावले होते.

या सामन्याआधी जसकरणने सहा एकदिवसीय आणि सहा टी २० सामने खेळले होते. मात्र दोन्ही प्रकारांमध्ये त्याला अर्धशतकापर्यंतही मजल मारता आली नव्हती. एकदिवसीय सामन्यात त्याचा सर्वोच्च स्कोअर १८ तर टी २० मध्ये ३८ इतका होता. ए लिस्ट क्रिकेटमध्येही जसकरणने २६ सामन्यांमध्ये २० च्या सरासरीने ४७३ धावा केल्या असून त्यात ३ अर्धशतकांचा समावेश आहे.