जगातील वेगवान धावपटू उसेन बोल्ट याने वीस महिन्यांनंतर पुनरागमन करताना किंग्स्टन स्पर्धेत २०० मीटर शर्यतीचे जेतेपद पटकावले. १०० व २०० मीटर शर्यतीचा विश्वविक्रमवीर बोल्टने ही शर्यत २०.२० सेकंदात पूर्ण केली. नेस्टा कार्टरने २०.६० सेकंदाची वेळ नोंदवून दुसरे स्थान पटकावले. या विजयानंतर बोल्टच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. त्याला २० सेकंदांच्या आत हे अंतर पूर्ण करता न आल्याने तो काहीसा निराश दिसला. २०१३च्या मॉस्को विश्व अजिंक्यपद स्पध्रेनंतर बोल्टने पहिल्यांदा २०० मीटर शर्यतीत सहभाग घेतला होता. तो म्हणाला, ‘‘शर्यतीत साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे पुन्हा कसून सराव करणार आहे. अजून पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे वाटत नाही. पूर्वीचा सूर गवसण्यासाठी अधिकाधिक शर्यतीत सहभाग घ्यायला हवा.’’