महान धावपटू उसेन बोल्टच्या स्वप्नवत कारकीर्दीचा कारुण्यमय शेवट

‘वेगाचा राजा’ हे बिरुद सार्थ ठरवत गेली दहा वष्रे अ‍ॅथलेटिक्स विश्वावर अधिराज्य गाजवणारा उसेन लिओ बोल्ट शनिवारच्या अखेरच्या लढाईत मात्र पराभूत झाला. आपल्या सोन्यासारख्या कारकीर्दीचा पूर्णविरामही सोनेरीच असावा, ही त्याची इच्छा होती. मात्र शर्यत जिंकण्याच्या इष्रेने धावताना पायाला झालेल्या दुखापतीमुळे वेदनेने विव्हळणारा करुण मुद्रेतील बोल्ट क्रीडारसिकांना बघावा लागला.

मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे बोल्ट जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पध्रेतील पुरुषांची ४ बाय १०० मीटर शर्यत पूर्ण करण्यात अपयशी ठरला. ३० वर्षीय बोल्टने आपल्या कारकीर्दीतील अखेरच्या शर्यतीत धावताना जमैकाचा सहकारी योहान ब्लेककडून बॅटन स्वीकारली. मात्र विजयरेषेपासून ४० मीटरचे अंतर असताना त्याच्या डाव्या पायाला तीव्र वेदना झाल्या. त्याही परिस्थितीत ब्रिटन आणि अमेरिकेच्या धावपटूंना मागे टाकण्याच्या प्रयत्नात त्याने लंगडत, अडखळत धावण्याचा प्रयत्न केला. परंतु पायाच्या तीव्र कळांनी त्याला थांबवण्यास भाग पाडले आणि क्षणार्धात तो ट्रॅकवरच कोसळला. दुखापतीपेक्षा शर्यत जिंकू न शकल्याचे दु:ख बोल्टच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते.

‘‘बोल्टच्या डाव्या मांडीच्या मागील बाजूचा स्नायू दुखावला आहे. मात्र शर्यत गमावल्याचे दु:ख अधिक वेदना देणारे आहे. गेले आठवडे त्याच्यासाठी खडतर ठरले होते. त्याने अखेरच्या शर्यतीत सर्वोत्तम कामगिरी करावी, यासाठी आम्ही अतिशय मेहनत घेतली होती,’’ असे जमैकाच्या पथकामधील वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. केव्हिन जोन्स यांनी सांगितले.

लंडनमधील याच स्टेडियमवर २०१२ मध्ये बोल्टने १०० मीटर, २०० मीटर आणि ४ बाय १०० मीटर शर्यत जिंकण्याची किमया साधली होती. मात्र पाच वर्षांनी ते यश पुन्हा मिळवण्यात बोल्ट अपयशी ठरला. हे नाटय़ करुण रसाने भारलेले होते. शतांश सेकंदाच्या फरकाने निकाल लागणाऱ्या या वेगाच्या शर्यतीमधील हे अपयश बोल्टला जिव्हारी लागणारे होते. गुडघ्यावर बसून डोक्यावर हात घेऊन तो शांतपणे या निसटलेल्या क्षणाकडे एकटाच पाहात राहिला. क्षणार्धात एकीकडे ब्रिटनच्या धावपटूने विजयरेषा ओलांडली तर ब्लेक, ज्युलियन फोर्टे आणि ओमर मॅक्लिओड या सहकाऱ्यांनी बोल्टकडे धाव घेत, त्याचे सांत्वन केले.

बोल्टने वेगाच्या शर्यतींवर गेली अनेक वष्रे वर्चस्व गाजवले. त्याला आव्हान इतक्या वर्षांत निर्माण झाले नव्हते. त्यामुळेच त्याच्या या प्रयत्नाला क्रीडारसिकांनी दाद दिली. मात्र स्थानिक चाहत्यांनी आपल्या देशाच्या विजेत्यांचेच कौतुक करण्यात धन्यता मानली आणि बोल्टला वैद्यकीय कक्षाकडे जावे लागले. शर्यतीच्या निकालपत्रकानुसार जमैकाच्या चमूने शर्यत पूर्ण केली नाही, हेच मांडण्यात आले.

मागील आठवडय़ापेक्षा ही शर्यत बोल्टसाठी जणू शोकांतिकाच ठरली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गेल्या शनिवारी १०० मीटर वैयक्तिक शर्यतीत बोल्टला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली होती. कट्टर प्रतिस्पर्धी जस्टिन गॅटलिनने त्याला हरवून सुवर्णपदकावर नाव कोरले होते. त्या शर्यतीच्या वेळी त्याला चाहत्यांनी मानवंदना दिली होती.

ब्रिटनच्या चमूने ३७.४७ सेकंदांच्या वेळेसे सुवर्णपदकजिंकले आणि अमेरिकेने (३८.०१ से.) रौप्यपदक पटकावले, तर जपानला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

२००८च्या बीजिंग ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेत बोल्टने १०० मी. आणि २०० मी. शर्यतींचे सुवर्ण जिंकले होते. तेव्हापासून त्याच्या वर्चस्वाला प्रारंभ झाला. आठ ऑलिम्पिक पदके आणि जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पध्रेची ११ पदके त्याच्या खात्यावर जमा आहेत.

  • बोल्टबरोबर कोणताही खेळाडू स्पर्धा करू शकत नाही. तो एक वैश्विक महानायक आहे. – मायकल जॉन्सन, माजी धावपटू
  • माझ्यात आणि बोल्टमध्ये एक धावपटू म्हणून तुलना होऊ शकते, पण एका गोष्टीसाठी मला त्याचा अभिमान वाटतो, त्याने धावण्याच्या बऱ्याच प्रकारांमध्ये सहभाग घेतला, त्याचबरोबर लांब उडीसारख्या प्रकारातही तो सहभागी झाला आहे. – कार्ल लुइस, माजी धावपटू
  • बोल्टपेक्षा जलद आतापर्यंत कुणीही धावू शकत नाही. कोटय़वधी लोकांमधील तो एकमेवाद्वितीय आहे. – बराक ओबामा, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष.
  • बोल्ट हा जमैकाचा सर्वात मोठा सदिच्छादूत आहे. आतापर्यंतच्या देदीप्यमान कामगिरीच्या जोरावर त्याने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्यामुळे जमैकाला मोठी उभारी मिळाली आहे. – अँड्रय़ू होलनेस, जमैकाचे पंतप्रधान
  • बोल्ट आदर्शवत असाच आहे. सर्वकालीन धावपटूंपैकी सर्वोत्तम. – जॅक्स रॉज, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे माजी अध्यक्ष