सिडनी : वेगाचे दुसरे नाव म्हणून प्रख्यात असलेल्या उसैन बोल्टने त्याच्या धावण्याच्या करिअरला विराम दिल्यानंतर आता फुटबॉलमध्ये त्याचे पाय अजमावून पाहण्याचे ठरवले आहे. त्यासाठी त्याची ऑस्ट्रेलियातील सेंट्रल कोस्ट मरीनर्स क्लबशी कराराबाबतची बोलणी अंतिम टप्प्यात आहेत.

१०० आणि २०० मीटर अंतराच्या शर्यतींमधील एकमेवाद्वितीय धावपटू म्हणून उसैन बोल्ट संपूर्ण जगाला ज्ञात आहे. मात्र ऑलिम्पिकच्या आठ सुवर्णपदकांसह सलग एक दशकभर वेगवान जगावर अधिराज्य गाजवल्यानंतर बोल्टने गतवर्षी निवृत्ती स्वीकारली होती. बोल्ट हा पूर्वीपासूनच मँचेस्टर युनायटेड क्लबचा चाहता असून त्याबाबत त्याने अनेकदा मतप्रदर्शनदेखील केले आहे. बोल्टने नुकताच नॉर्वेच्या स्ट्रॉम्सगॉडसेट आणि बुंडेसलिगाच्या बोरुसिया डॉर्टमंड क्लबमध्ये जाऊन काही काळ प्रशिक्षण घेतले. आता ऑस्ट्रेलियाच्या एका क्लबसमवेत त्याच्या कराराची बोलणी अंतिम टप्प्यात आहेत. त्यानुसार बोल्ट हा सिडनीनजीकच्या गॉर्सफोर्ड येथे क्लबसमवेत सहा आठवडे राहून खेळणार असून त्यानंतर पुढील निर्णय घेणार आहे.

महानायक लाभेल

‘‘ए लीगला एका महानायकाची गरज होती. आणि ऑस्ट्रेलिया फुटबॉल फेडरेशनने त्यासाठी काही मदत करण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे बोल्टच्या रूपाने आम्हाला खराखुरा महानायक लाभणार आहे. त्यामुळे या कराराबाबत गत चार ते पाच महिन्यांपासून प्रयास सुरू असून आता तो अंतिम टप्प्यात आहे,’’ असे क्लबचे मुख्य कार्यकारी अधिकारी शॉन मिलेकॅम्प यांनी सांगितले. ‘‘अर्थात सर्वप्रथम क्लबबरोबर खेळताना बोल्टचे फुटबॉल कौशल्यदेखील आम्ही पडताळून पाहणार आहोत. त्यानंतर तो कदाचित आमच्या क्लबकडून ए लीगमध्येदेखील खेळताना दिसू शकतो,’’ असेही शॉन यांनी नमूद केले. ए लीगला ऑक्टोबर महिन्यात प्रारंभ होणार असल्याने आता त्याकडे फुटबॉल शौकिनांच्या नजरा वळल्या आहेत.