मेलबर्न : अनुभवी फलंदाज उस्मान ख्वाजा आणि शॉन मार्श यांना क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या वार्षिक करारात स्थान मिळवता आले नाही. मात्र या करारात मार्नस लॅबूशेन आणि जो बर्न्‍स यांसह सहा नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. करोनामुळे ही यादी जाहीर करण्यास विलंब झाला असला तरी मिचेल मार्श, अ‍ॅश्टन अगर, बर्न्‍स, लॅबूशेन, केन रिचर्डसन आणि मॅथ्यू वेड यांनी या करारात स्थान मिळवले आहे. २०१८मध्ये ऑस्ट्रेलियातर्फे कसोटी पदार्पण केल्यानंतर लॅबूशेन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. त्याने १४ कसोटींत १४५९ धावा केल्या आहेत. बर्न्‍स याने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५०पेक्षा जास्त सरासरीने धावा काढल्या आहेत.

गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदाच ख्वाजाला करारात स्थान मिळवता आले नाही.

ऑस्ट्रेलियाच्या करारबद्ध खेळाडूंची यादी

अ‍ॅश्टन अगर, जोन बर्न्‍स, अ‍ॅलेक्स कॅरे, पॅट कमिन्स, आरोन फिंच, जोश हेझलवूड, ट्रेव्हिस हेड, मार्नस लॅबूशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, टिम पेन, जेम्स पॅटिन्सन, झाय रिचर्डसन, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झाम्पा.