पीयूष चावलाच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर उत्तर प्रदेशने मुश्ताक अली ट्वेन्टी २० क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राचा सात विकेट्स राखून पराभव केला.

धुक्यामुळे हा सामना बारा षटकांचाच खेळविण्यात आला. चावला व अंकित रजपूत यांच्या प्रभावी गोलंदाजीपुढे महाराष्ट्राला १२ षटकांत सात फलंदाजांच्या मोबदल्यात केवळ १०९ धावांपर्यंत मजल मारता आली. कर्णधार केदार जाधव याचा अपवाद वगळता महाराष्ट्राचा एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. उत्तर प्रदेशने विजयाचे लक्ष्य ११.२ षटकांत व तीन फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले.

चावलाची हॅट्ट्रिक हे खेळाचे वैशिष्टय़ ठरले. त्याने डावातील आठव्या षटकात पाचव्या चेंडूवर श्रीकांत मुंढे व सहाव्या चेंडूवर राहुल त्रिपाठीला बाद केले. त्यानंतर त्याला पुन्हा अकराव्या षटकात पाचारण करण्यात आले. त्या वेळी त्याने पहिल्याच चेंडूवर निखिल नाईकला तंबूत धाडत हॅट्ट्रिक पूर्ण केली.

विजयासाठी ११० धावांचे लक्ष्य गाठताना उत्तर प्रदेशला १२व्या षटकापर्यंत वाट पाहावी लागली. प्रशांत गुप्ता (३५), उमंग शर्मा (नाबाद ३२) व अक्षयदीप नाथ (नाबाद ३४) यांनी केलेल्या चमकदार खेळीमुळे त्यांना विजय मिळविता आला.

संक्षिप्त धावफलक

महाराष्ट्र १२ षटकांत ७ बाद १०९ (केदार जाधव नाबाद ५२; पीयूष चावला ४/२८, अंकित रजपूत ३/१५) पराभूत वि. उत्तर प्रदेश ११.२ षटकांत ३ बाद ११३ (प्रशांत गुप्ता ३५, उमंग शर्मा नाबाद ३२, अक्षयदीप नाथ नाबाद ३४).