फॉलोऑननंतर उत्तर प्रदेशने सामना अनिर्णीत राखला
वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीकडून पुरेशी साथ न मिळाल्यामुळे सहाशे धावांचा डोंगर उभारूनही मुंबईला पहिल्या डावातील आघाडीच्या तीन गुणांवर समाधान मानावे लागले. मुंबईने अखेरच्या दिवशी उत्तर प्रदेशचा पहिला डाव गुंडाळून फॉलोऑन लादला आणि त्यांना पुन्हा फलंदाजीला आमंत्रित केले, परंतु उत्तरेच्या फलंदाजांनी सामना अनिर्णीत राखला. मात्र मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या ‘ब’ गटात २० गुणांसह अव्वल स्थान टिकवले आहे.
उत्तर प्रदेशने ५ बाद ३५० धावसंख्येवरून आपल्या पहिल्या डावाला सोमवारी पुढे प्रारंभ केला. परंतु एकलव्य द्विवेदी (६६) आणि पीयूष चावला (८४) बाद झाल्यानंतर उत्तरेच्या तळाच्या फलंदाजांनी फारसा प्रतिकार केला नाही. फक्त ९० धावांत उत्तर प्रदेशचे उर्वरित पाच फलंदाज तंबूत परल्यामुळे त्यांचा पहिला डाव ४४० धावसंख्येवर संपुष्टात आला. अभिषेक नायर आणि विशाल दाभोळकर यांनी प्रत्येकी चार बळी घेतले.
उपाहारानंतरचा दोन सत्रांचा खेळ बाकी असल्यामुळे आशावादी मुंबईने १७० धावांच्या आघाडीसह उत्तर प्रदेशला फॉलोऑन दिला. त्यानंतर विशालने एकलव्य द्विवेदीला (६) लवकर बाद करण्याची किमया साधली, पण हिमांशू अस्नोरा (नाबाद ६८) आणि उमंग शर्मा (नाबाद ६२) यांनी दुसऱ्या विकेटसाठी नाबाद १२८ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला आणि सामना अनिर्णीत राहिला.

संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ९ बाद ६१० डाव घोषित
उत्तर प्रदेश (पहिला डाव) : १५१ षटकांत सर्व बाद ४४० (हिमांशू अस्नोरा ९२, पीयूष चावला ८४, एकलव्य द्विवेदी ६६, उमंग शर्मा ५३) उत्तर प्रदेश (दुसरा डाव) : ४५ षटकांत १ बाद १४० (हिमांशू अस्नोरा नाबाद ६८, उमंग शर्मा नाबाद ६२; विशाल दाभोळकर १/३०)

पहिल्या डावात सहाशे धावा उभारल्यानंतर आम्ही या सामन्यात निकालाची अपेक्षा केली होती. ५६ षटकांचा खेळ बाकी असल्यामुळे आम्ही फॉलोऑन दिला आणि विजयाची आशा केली. तामिळनाडूच्या संघाला आम्ही ३६ षटकांत गुंडाळले होते. त्याची आठवण संघातील खेळाडूंना करून दिली. तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी खेळपट्टीकडून गोलंदाजांना साथ मिळेल, असे वाटले होते. पण ती मिळाली नाही.
-चंद्रकांत पंडित, मुंबईचे प्रशिक्षक