ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघात फिरकीपटू आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना स्थान न देता विश्रांती देण्यात आली. या निर्णयावर बऱ्याच जणांनी टीका केली असली तरी भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने हा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे.

‘‘चॅम्पियन्स करंडक स्पर्धेनंतर निवड समितीने धोरणांमध्ये काही बदल केले आहेत. फिरकी माऱ्यामध्ये विविधता यावी यासाठी त्यांनी मनगटाच्या जोरावर चेंडू वळवणाऱ्या फिरकीपटूंना संधी देण्याचे ठरवले असावे. याबाबत निवड समितीने अश्विन आणि जडेजा यांच्याशी संवाद साधला असेल,’’ असे लक्ष्मण म्हणाला.

लंडनमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषकाची संघबांधणी करण्याचा निर्णय निवड समितीने घेतला असून त्यामुळे संघात काही प्रयोग केले जात आहेत. प्रत्येक खेळाडूला चाचपडून पाहिले जात असून त्यानंतरच विश्वचषकाचा संघ निवडण्यात येणार आहे.

‘‘अश्विन आणि जडेजा संघात नाहीत, याचा अर्थ त्यांना डच्चू दिला असा होत नाही. त्यांनाही यापुढे संधी दिली जाऊ शकते. हार्दिक पंडय़ाला फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये अधिक सातत्य दाखवावे लागेल. यापूर्वी महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना ज्या पद्धतीने भारताला सामना जिंकवून द्यायचे, ती भूमिका पंडय़ाला यापुढे वठवावी लागणार आहे,’’ असे लक्ष्मणने सांगितले.