कोपा डेल रे चषक फुटबॉल स्पर्धा

माद्रिद : रेयाल बेटिसच्या सेव्हिले येथील बेनिटो व्हिलामारिन स्टेडियमवर कोपा डेल रे चषक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम थरार रंगणार आहे. मात्र घरच्या मैदानावर अंतिम फेरीत खेळण्याचे रेयाल बेटिसचे स्वप्न व्हॅलेंसियाने उधळून लावले. गुरुवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात व्हॅलेंसियाने बेटिसचा १-० असा पराभव केला.

आता २५ मे रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत व्हॅलेंसियाला बार्सिलोनाशी लढत द्यावी लागेल. आघाडीवर रॉड्रिगो याने ५६व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे व्हॅलेंसियाने विजय मिळवला. पहिल्या फेरीतील लढत २-२ अशा बरोबरीत सुटल्यामुळे हाच गोल व्हॅलेंसियासाठी निर्णायक ठरला. त्यांनी ३-२ अशा फरकाने रेयाल बेटिसवर मात करून अंतिम फेरी गाठली. बार्सिलोनाने बुधवारी रेयाल माद्रिदचा ३-० असा पराभव करून सलग सहाव्यांदा कोपा डेल रे स्पर्धेच्या अंतिम फेरीत मजल मारली आहे.

‘‘अंतिम फेरीत खेळण्याची आमची इच्छा होती, पण दुर्दैवाने काही गोष्टी आमच्या विरोधात घडत गेल्या. फुटबॉलमध्ये अशा क्षणांना सामोरे जावे लागतेच,’’ असे रेयाल बेटिसचा बचावपटू मार्क बारट्रा याने सांगितले. २००८ नंतर व्हॅलेंसियाने कोपा डेल रे स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ‘‘संपूर्ण मोसमात आम्ही चांगली कामगिरी केली असून त्याचेच फळ आम्हाला मिळाले आहे. अंतिम फेरीत मजल मारल्याने आम्ही आनंदी आहोत. हे वर्ष आमच्या क्लबसाठी लाभदायी ठरले आहे,’’ असे रॉड्रिगो याने सांगितले.