* सँटी मिनाचा निर्णायक गोल
* रिअल माद्रिदचा दमदार विजय
नवीन प्रशिक्षक गॅरी नेव्हिल यांच्या मार्गदर्शनाखाली उतरलेल्या व्हॅलेंसिआने सँटी मिनाने अखेरच्या क्षणी केलेल्या गोलच्या जोरावर युरोपियन विजेत्या बार्सिलोनाला १-१ असे बरोबरीत रोखले. व्हॅलेंसिआने दाखवलेल्या जिद्दीमुळे प्रशिक्षक नेव्हिल यांनाही हुरूप मिळाला आहे. दुसरीकडे रिअल माद्रिदने ४-१ अशा फरकाने गेटाफेवर विजय मिळवला. या विजयामुळे माद्रिद गुणतालिकेत अव्वल असलेल्या बार्सिलोनापासून अवघ्या चार गुणांनी पिछाडीवर राहिला आहे.
बार्सिलोना आणि व्हॅलेंसिया यांच्यातील सामन्यात ५९ व्या मिनिटाला लुइस सुआरेझने गोल करून बार्सिलोनाला आघाडी मिळवून दिली. सुआरेझचा हा गोल ऑफ साईड असतानाही पंचांनी त्याला मान्यता दिल्याने सामन्यात थोडासा वाद निर्माण झाला, परंतु व्हॅलेंसिआने चिकाटीने खेळ करून गतविजेत्या बार्सिलोनाला बरोबरीवर समाधान मानण्यास भाग पाडले. ८६ व्या मिनिटाला फ्रान्सिस्को गार्सिआच्या पासवर मिनाने निर्णायक गोल नोंदवला.
अपात्र खेळाडू खेळविल्यामुळे कोपा डेल रे स्पध्रेतून हकालपट्टी करण्यात आलेल्या माद्रिदने करिम बेंझेमा (२), गॅरेथ बॅले आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्या ‘गोल’धडाक्याच्या जोरावर गेटाफे क्लबचा ४-१ असा पराभव केला. गेटाफेकडून अ‍ॅलेक्सिसने एकमेव गोल केला. या विजयानंतरही माद्रिद तिसऱ्या स्थानावर असून दोन गुणांच्या आघाडीसह अ‍ॅटलेटिको माद्रिद दुसऱ्या स्थानावर आहे. अ‍ॅटलेटिकोने २-० अशा फरकाने ग्रॅनडाचा पराभव केला. दिएगो गॉडीन आणि अँटोनी ग्रिएझमन यांनी प्रत्येकी एक गोल केला.