प्राजक्ता, शंकर अर्धमॅरेथॉनचे मानकरी

भारतीय सैन्यदलाच्या करण सिंगने आपला दबदबा कायम राखत यंदादेखील वसई-विरार महापौर मॅरेथॉन शर्यतीत सलग दुसऱ्या वर्षी बाजी मारली, तर प्राजक्ता गोडबोले आणि शंकर थापा यांनी अर्धमॅरेथॉन शर्यत जिंकण्याची किमया साधली.

सकाळच्या गुलाबी थंडीत प्रारंभ झालेल्या पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेला सकाळी निर्धारित वेळेत प्रारंभ झाल्यानंतर प्रमुख धावपटूंनी आघाडी घेण्यास प्रारंभ केला. त्यात सैन्यदलाच्या करणने प्रारंभापासून पहिल्या पाचांमध्ये राहण्याचे धोरण ठेवले. दोन-तृतीयांश अंतर पार केल्यानंतर त्याने एकेका धावपटूला मागे टाकत अव्वल स्थानावर मुसंडी मारली. मात्र अखेरच्या टप्प्यापर्यंत अन्य धावपटूंनीदेखील करणला तोडीसतोड धाव घेत त्याला चांगली लढत दिली. मात्र करणने त्याची अल्पशी आघाडी अखेपर्यंत कायम राखत ४२ किलोमीटरचे अंतर २ तास २२ मिनिटे ४२ सेकंद या वेळेत पूर्ण केले. द्वितीय क्रमांकावर आलेल्या लालजी यादवने २ तास २२ मिनिटे ५८ सेकंद तर तृतीय क्रमांकावरील शामरू जाधवने २ तास २३ मिनिटे ०८ सेकंद वेळ नोंदवली. करणने अनुभवाच्या बळावर पुन्हा एकदा पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेवर छाप पाडली.

या स्पर्धेच्या विविध गटांमध्ये धावणाऱ्या हजारो धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारताची अव्वल धावपटू द्युती चंद उपस्थित होती. वसई-विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धेचे यंदाचे आठवे पर्व होते. दशकाच्या प्रारंभापासून सुरू झालेल्या या स्पर्धेचे नाव देशभरात झाले असल्याने अनेक राज्यांसह नेपाळ, भूतान आणि आसपासच्या देशांतील धावपटूदेखील या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनीदेखील रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.

महिला अर्धमॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राचा दबदबा

महिला अर्धमॅरेथॉन स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींचा दबदबा राहिला. नागपूरच्या प्राजक्ता गोडबोलेने १ तास १८ मिनिटे ५६ सेकंद अशी वेळ देत प्रथमच महिलांच्या गटात विजेतेपद पटकावले, तर मंजू यादवने १ तास १९ मिनिटे ३० सेकंद आणि नाशिकच्या आरती पाटीलने १ तास १९ मिनिटे ५० सेकंदांची वेळ नोंदवत तृतीय क्रमांक पटकावला. महाराष्ट्राच्याच किरण सहदेव आणि जनाबाई हिरवे या अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर राहिल्या.