अंतिम सामन्याआधी वेदा कृष्णमूर्ती आशावादी

मेलबर्न : यंदाच्या विश्वचषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत भारताला नशिबाने अनेकदा साथ दिली. त्यामुळेच अंतिम सामन्यातही नशिबाचा कौल भारताच्याच बाजूने असेल, अशी आश्वासक प्रतिक्रिया भारतीय महिला संघाची अष्टपैलू फलंदाज वेदा कृष्णमूर्तीने व्यक्त केली.

रविवार, ८ मार्च रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाची अंतिम फेरी रंगणार आहे. आतापर्यंत स्पर्धेत एकही लढत न गमावलेल्या भारताला चार वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियावर सरशी साधण्यासाठी मेहनतीबरोबरच नशिबाची साथ आवश्यक असल्याचे वेदाने सांगितले.

‘‘मी नेहमीच नशिबावर विश्वास ठेवत आली आहे. कोणालाही आमच्याकडून फारशी अपेक्षा नसताना आम्ही अंतिम फेरी गाठली. यामध्ये नशिबाचाही सिंहाचा वाटा आहे. अनेकांना हे हास्यास्पद वाटू शकते, परंतु स्पर्धेच्या सुरुवातीपासून ते उपांत्य फेरीपर्यंत प्रत्येक लढतीत आमच्या मेहनतीला नशिबाचीही साथ लाभली आहे. त्यामुळे अंतिम फेरीतसुद्धा नशिबाचा कौल आमच्याच बाजूने असेल,’’ असे २७ वर्षीय वेदा म्हणाली.

भारत-इंग्लंड यांच्यातील गुरुवारी होणारा उपांत्य सामना पावसामुळे रद्द करण्यात आला; परंतु साखळी सामन्यांत सर्वाधिक विजयांसह गटात अग्रस्थान मिळवल्यामुळे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने प्रथमच विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील स्थान पक्के केले. त्याउलट इंग्लंडला मात्र आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाचा फटका बसला.

‘‘वातावरण, हवामान यांसारख्या गोष्टी आमच्या हाती नसतात, परंतु साखळी सामन्यांत अधिक मेहनत केल्यामुळेच आम्ही इथवर मजल मारली. कारकीर्दीत दुसऱ्यांदा एखाद्या विश्वचषकात भारताचे अंतिम फेरीत प्रतिनिधित्व करण्याची मला संधी आहे. अंतिम सामन्यातील पराभव किती जिव्हारी लागणारा असतो, हे मला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे यंदा विश्वचषकासह मायदेशी परतू,’’ असेही वेदाने सांगितले.

आतापर्यंतच्या सामन्यांत संघाच्या विजयात फारसे योगदान देणे जमले नसले तरी अंतिम फेरीत गरजेच्या वेळा उपयुक्त धावा काढून संघासाठी माझी भूमिका निभावण्यासाठी मी सज्ज आहे, असेही वेदाने नमूद केले.

शफालीच्या फटकेबाजीपासून सावध – मेगान शुट

सिडनी : भारताची सलामीवीर शफाली वर्माच्या बेधडक फलंदाजीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मी पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करणे टाळणार आहे, अशी कबुली ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाज मेगान शुटने दिली.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य लढतीत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या शुटने अंतिम फेरीसाठी संघ सज्ज असल्याचे सांगितले असले तरी स्पर्धेतील पहिल्याच साखळी सामन्यात शफालीने शुटच्या एकाच षटकात लगावलेले चार चौकार तिला अद्यापही बेचैन करतात.

‘‘मला भारताविरुद्ध खेळायला अजिबात आवडत नाही. त्यांचे फलंदाज नेहमीच माझ्यावर वर्चस्व गाजवतात. विशेषत: शफालीविरुद्ध मी पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करण्याचे जाणीवपूर्वक टाळेन. तिरंगी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शफालीने माझ्या गोलंदाजीवर लगावलेला षटकार मला अजूनही आठवतो,’’ असे २७ वर्षीय शुट म्हणाली.